चंद्र, सूर्य असेपर्यंत संविधान राहील!

मुख्यमंत्री सावंत : भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज


17th April, 12:29 am
चंद्र, सूर्य असेपर्यंत संविधान राहील!

जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करताना श्रीपाद नाईक. सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, विश्वजीत राणे आणि जेनिफर मोन्सेरात. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
मडगाव/पणजी : सर्वधर्मसमभाव बाळगून ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणातून भाजपने विकास केला आहे. संविधानावर घाला घालण्यात येत असल्याचे सांगून काँग्रेस व विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेेले संविधान चंद्र, सूर्य असेपर्यंत कायम राहील, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
भाजपचे उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी पणजीत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांच्यासमोर सादर केला. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी डमी अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. तत्पूर्वी भाजप कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांना आमदारांनी मार्गदर्शन केले. नंतर उत्तर गोव्यातील बहुतांश भाजपचे आमदार आणि शेकडो कार्यकर्त्यांनी रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.


दक्षिण गोवा मतदारसंघाच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांनीही मंगळवारी मडगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू ए. यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री आलेक्स सिक्वेरा, मंत्री रवी नाईक, मंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली व मोदींनी केलेल्या कामांची यादीच सादर केली. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा मोदी सरकारकडून देण्यात आल्या आहेत. काँग्रेसने लोकांना कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत, तर पाणी, शौचालय, घरे, वीज या मूलभूत सुविधांवर मोदी सरकारने भर दिला. पुढील २० दिवस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सरकारने केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवावीत. राज्यातील हिंदू, मुस्लिम, ख्रिस्तीबांधव भाजपसोबत आहेत. त्यामुळे पल्लवी धेंपो व श्रीपाद नाईक यांचा विजय निश्चित आहे.
कामत, सिक्वेरा, नाईक, ढवळीकरांमुळे ताकद वाढली
२०१९ मध्ये काही मतांनी दक्षिण गोव्याची जागा हुकली होती. मात्र, त्यावेळी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, रवी नाईक, आलेक्स सिक्वेरा, सुदिन ढवळीकर हे आमच्यासोबत नव्हते. ते सर्व आता भाजपसोबत आहेत. डबल ताकद भाजपसोबत असल्याने यावेळी विजय निश्चित आहे. काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराला माॅविन गुदिन्हो यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत दाबोळी मतदारसंघातून हरवले आहे, हे लक्षात ठेवा, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
संविधानाबाबत बोलण्याआधी आमदारांचा मान राखा : मुख्यमंत्री
संविधान, लोकशाहीवर बोलणाऱ्यांनी आधी आमदारांना मान द्यायला शिकावे. आमदारांवर नाहक टीका करतानाही शब्द जपून वापरावेत. आमदारांसाठी असंविधानिक शब्द वापरू नये. वायफळ टीका करणे बंद न केल्यास लोक गप्प राहणार नाहीत. दक्षिण गोवा हातातून जात असल्याचे पाहून काँग्रेस घाबरली आहे. रामाच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचा असल्याने अर्जांचे सादरीकरण एक दिवस आधी केले. रामसेतू तोडण्यासाठी ज्यांनी प्रतिज्ञापत्र दिले, त्यांनी रामनवमीचे महत्त्व आम्हाला सांगू नये, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
काँग्रेस उमेदवार आज भरणार अर्ज
काँग्रेसचे दोन्ही उमेदवार बुधवारी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस सकाळी ११ वाजता, तर उत्तर गोव्याचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप दुपारी १२.३० वाजता उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली.