पोंटे डी लिमा बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या अमेय अवदीची चमक

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 12:27 am
पोंटे डी लिमा बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या अमेय अवदीची चमक

पणजी : पोर्तुगाल येथे आयोजित पोंटे डी लिमा बुद्धिबळ महोत्सव ओपन रॅपिड चेस २०२४ मध्ये आपली प्रतिभा दाखवताना आंतरराष्ट्रीय मास्टर अमेय अवदीने उत्कृष्ट कामगिरी केली.

गोव्याच्या अमेयने आयएम मॅनियन स्टीफन रिचर्ड (एससीओ), कोस्टा गिल कोरीया, तारेल्हो ब्रुना सिल्वा, सिल्वा रेनाल्डो जोआओ, डेव्हिड बतिस्ता दा, फरेरा वास्को, कॅपिटाओ मेंडेस, कोस्टा रुल, पोर्तुगालच्या फेलिप मॅगाल्हेस दा आणि स्पेनच्या सेर्नाडास डेव्हिड काडे यांच्यावर प्रभावी विजय मिळवला.

१५ व्या मानांकित अमेयच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने ९ फेऱ्यांपैकी ७ विजय मिळवून ७ गुण जमा केले आणि इतर तीन खेळाडूंसह संयुक्त दुसरे स्थान पटकावले. टायब्रेकरवर पाचव्या स्थानावर असूनही त्याची कामगिरी शानदार ठरली. प्रथम क्रमांकाचा मान युक्रेनच्या आयएम रोशिका येवगेनलीने ७.५ गुणांसह मिळवला, तर मॉन्टेनेग्रोच्या जीएम पेट्रोव्ह निकिता, जीएम कोवचन अलेक्झांडर आणि युक्रेनच्या आयएम लार्किन व्लादिस्लाव यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि चौथे स्थान मिळविले.

या स्पर्धेत १३ देशांतील ७९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेचे जागतिक आकर्षण आणि स्पर्धात्मकता अधोरेखित केली. अमेयचे उल्लेखनीय कामगिरी हे त्याच्या कौशल्य, दृढनिश्चय आणि खेळाविषयीच्या उत्कटतेचा पुरावा आहे आणि त्याला बुद्धिबळ समुदायामध्ये चांगली ओळख मिळाली आहे.