पल्लवी धेंपो देशातील सर्वांत श्रीमंत उमेदवार, ज्योतिरादित्यांचा दुसरा क्रमांक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th April, 11:41 am
पल्लवी धेंपो देशातील सर्वांत श्रीमंत उमेदवार, ज्योतिरादित्यांचा दुसरा क्रमांक

पणजी : लोकसभा निवडणुकीच्या आगामी तिसऱ्या टप्प्यात ३९२ कोट्यधीश उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांचा सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून उल्लेख झाला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती १,३६१ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमधील केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांची संपत्ती ४२४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ते मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या तिकिटावर महाराष्ट्राच्या कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे छत्रपती शाहू शाहजी यांची एकूण संपत्ती ३४२ कोटींहून अधिक आहे.

दरम्यान, पाच उमेदवार असेही आहेत ज्यांच्याकडे कसलीच मालमत्ता नाही. त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे कोल्हापुरातील अपक्ष उमेदवार इराफान अबुतालिब चांद, ज्यांची संपत्ती १०० रुपये आहे आणि गुजरातच्या बारडोली येथील बसपा उमेदवार, ज्यांची मालमत्ता केवळ २,००० रुपये आहे.

ADR आणि नॅशनल इलेक्शन वॉचने केलेल्या विश्लेषणात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या निवडणूक लढवणाऱ्या १३५१ उमेदवारांच्या स्व-शपथपत्रांची छाननी करण्यात आली. या उमेदवारांमध्ये ३९२ (२९ टक्के) कोट्यधीश आहेत.

पक्षनिहाय कोट्यधीश उमेदवार

प्रमुख पक्षांचा विचार करता जेडीयूचे ३ पैकी १०० टक्के उमेदवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५ पैकी सर्व ५ उमेदवार, NCP ३ पैकी सर्व ३ उमेदवार, आरजेडी ३ पैकी सर्व ३ उमेदवार, शिवसेनेच्या २ पैकी २ उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ३ पैकी सर्व ३ उमेदवार, भाजप ८२ पैकी ९४ टक्के उमेदवार, काँग्रेसचे ६८ पैकी ८८ टक्के, सपाचे १० पैकी ९० टक्के उमेदवार, आणि एआयटीसी यांचे ६७ टक्के उमेदवारांची मालमत्ता १ कोटींपेक्षा जास्त आहे.

पक्षनिहाय, भाजप कोट्यधीश उमेदवारांच्या संख्येत आघाडीवर आहे, ८२ पैकी ७७ उमेदवारांनी (९४%) १ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रति उमेदवार सरासरी मालमत्ता ५.६६ कोटी रुपये आहे. उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या उमेदवारांची प्रति उमेदवार सर्वाधिक सरासरी ८९.६८ कोटी रुपये आहे, तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या उमेदवारांची ६२.६४ कोटी रुपये आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९४ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यातील जागांसाठी एकूण १,३५१ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, गुजरातमधील सुरत पीसीमधून एका उमेदवाराने बिनविरोध विजय मिळवला आहे.