युरी आलेमाव यांच्या टिप्पणीनंतर भंडारी युवा आक्रमक

सात दिवसांत आरोलकर यांची माफी मागण्याचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 11:47 pm
युरी आलेमाव यांच्या टिप्पणीनंतर भंडारी युवा आक्रमक

पत्रकार परिषदेत बोलताना दिक्षक नाईक अडपईकर. सोबत इतर.

पणजी : विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी आमदार जीत आरोलकर यांना अपशब्द वापरून संपूर्ण भंडारी समाजाचा अपमान केला आहे. यामुळे त्यांनी पुढील सात दिवसांत आरोलकर यांची बिनशर्त माफी मागावी. असे न झाल्यास त्यांना भंडारी समाजाकडून तीव्र विरोध स्वीकारावा लागेल, असा इशारा गोमंतक भंडारी समाज युवा समितीने दिला आहे.
मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे माजी अध्यक्ष दिक्षक नाईक अडपईकर यांनी सांगितले की, सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे. अशावेळी राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही. मात्र, एखाद्या नेत्याला अपशब्द वापरणे किंवा व्यक्तिगत टीका करणे चुकीचे आहे. त्यांनी आरोलकर यांना ‘लापीट’ हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ काहीही किंमत नसलेला माणूस असा होतो.
ते म्हणाले, जीत आरोलकर हे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले आहेत. त्यांनी गोव्यासाठी व्हॉलिबॉल खेळले आहे. त्यांचे गोव्यात आणि विशेष करून भंडारी समाजात मोठे स्थान आहे. अशा व्यक्तींसाठी ‘लापीट’ हा शब्द वापरणे हे भंडारी समाज सहन करून घेणार नाही. भंडारी समाजातील व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षासाठी काम करू शकतात. आम्ही त्यांच्यावर कसलेही बंधन घातलेले नाही. आज विविध राजकीय पक्षात भंडारी समाजाचे नेते आहेत.
युरी यांच्या पक्षात देखील भंडारी नेते आहेत. ते वैमानिक होते. विमान कधी लँड करायचे? कधी टेक ऑफ करायचे हे त्यांना नेमके माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांना वेगळे काही सांगणार नाही. त्यांनी आपली चूक मान्य करून आरोलकर यांची बिनशर्त माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर भंडारी समाजाचे वादळ रौद्ररूप धारण करेल. सात दिवसांत माफी मागितली नाही तर आम्ही पुढील कारवाईबाबत विचार करणार असल्याचे अडपईकर यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेत्यांनी एनडीएचे आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात वापरलेली भाषा अत्यंत निंदनीय आहे. संविधान धोक्यात असल्याची भाकड कथा सांगणाऱ्यांनाच लोकशाही मूल्यांचा आदर नाही. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

सदर प्रतिक्रिया देताना मी कुणाचेही नाव घेतले नव्हते. तरी देखील भंडारी समाजातील काही युवकांना माझे शब्द योग्य वाटत नाहीत आणि यामुळे ते त्यांच्या भावना दुखावल्याचा दावा करत असतील तर माफी मागण्यास माझी हरकत नाही. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते