पिळर्णमध्ये सापडला अज्ञात युवकाचा मृतदेह; खुनाचा संशय

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
16th April, 03:17 pm
पिळर्णमध्ये सापडला अज्ञात युवकाचा मृतदेह; खुनाचा संशय

म्हापसा : पिळर्ण, पर्वरी येथील ऑडिट भवनच्या जवळ एका २०  ते २५ वर्षीय युवकाचा संशयास्पदरित्या जखमी अवस्थेत मृतदेह सापडला आहे. बुधवारी सदर अज्ञात मृतदेहावर शवविच्छेदन होणार असून त्यानंतर मयताच्या मृत्यू मागचे कारण स्पष्ट होणार आहे. मंगळवारी पहाटे 2 च्या सुमारास गस्तीवेळी पर्वरी पोलिसांच्या पीसीआर रॉबर्ट गाडीतील पोलिसांना ऑडीट भवन जवळ रस्त्याच्या कडेला हा मृतदेह आढळला. लगेच या पोलिसांनी पर्वरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक जितेंद्र नाईक यांच्या नेृत्वाखाली पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला. 

मयताच्या शरिरावर काही जखमा होत्या. या जखमा खूनाच्या हेतूने मारहाण केल्याच्या की हीट अ‍ॅण्ड रन अपघातामुळे झाल्या आहेत हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे उद्या बुधवारी मयताच्या मृतदेहावर गोमेकॉत शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. 

 दरम्यान, या अज्ञात मयताच्या अंगावर त्याची ओळख पटवणारी कोणतेही आळखपत्रे सापडलेली नाहीत. पर्वरी व आजूबाजूच्या पोलिसांत दुपारपर्यंत कुणी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंद झालेली नाही. त्यामुळे पोलीस मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पर्वरी पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हण़ून नोद केले असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक जितेंद्र नाईक व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.