प्रकल्पांबाबत भाजपची भूमिका तीच आपली भूमिका : पल्लवी धेंपो

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 01:17 pm
प्रकल्पांबाबत भाजपची भूमिका तीच आपली भूमिका : पल्लवी धेंपो

मडगाव : लोकसभा निवडणुकीत जिंकून आल्यावर आपण लोकांसाठी अहोरात्र काम करणार. लोकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न असेल. प्रचारावेळी बेरोजगारी, शिक्षण, महिला सशक्तीकरणाबाबत विचारणा झाली. पर्यावरण व विकासकामे एकमेकांसोबत पुढे नेण्यात येतील. भाजपची प्रकल्पांबाबत जी भूमिका असेल तीच आपली असेल, असे भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून लोकसभा उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर उमेदवार पल्लवी धेंपो यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पर्यावरण व विकासाचे प्रकल्पांत ताळमेळ राखून विकासकामे केली जातील, असे स्पष्ट केले. धेंपो यांनी सांगितले की, भाजपच्या राज्यस्तरीय व केंद्रीय नेतृत्वाने लोकसभा उमेदवारी देत आपणावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार. लोकांच्या सेवेसाठी सदोदीत काम करणार. विरोधक वारंवार टीका करतात, त्यावर आपण कोणताही प्रतिक्रिया देणार नाही. आपण प्रचारावर व लोकांच्या गाठीभेटी घेण्यावर लक्ष केंद्रीय केलेला आहे. 

दक्षिण गोव्यातील आतापर्यंतच्या प्रचारावेळी लोकांकडून बेरोजगारी, कौशल्यविकास, शिक्षण व महिला सशक्तीकरण या विषयांवर विचारणा होते. मायनिंगबाबत थेट असे कुणी प्रश्न केलेले नाहीत. पण रोजगाराच्या संधी कमी असल्याबाबत विचारणा होते. म्हादईचा विषय हा न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर काहीही बोलणे योग्य नाही. आपण आता भाजप पक्षात आहोत, त्यामुळे रेल्वे दुपरीकरण, कोळसा वाहतूक व इतर विषयांवर व प्रकल्पांबाबत भाजप पक्षाची जी भूमिका असेल ती आपली भूमिका असणार. लोकांना आपल्याला भेटण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. निवडून आल्यानंतर आपण मडगावात कार्यालय उघडणार आहोत, असेही स्पष्ट केले. 

 प्रकल्पांना होणाऱ्या विरोधाबाबत बोलताना वीजमंत्री ढवळीकर यांनी सांगितले की, जे लोक कोकण रेल्वेला विरोध करत होते व तेच आता रेल्वेने प्रवास करतात. तेच लोक आता राज्यातील प्रकल्पांना विरोध करत आहेत. सागरमाला योजना आली तरीही कोळसा आता जेवढा येत आहे तेवढाच वाहतूक होणार आहे. भाजपसोबत मगो पक्ष आहे. त्यामुळे त्याचा फायदा किती होणार हे निकालातून दिसून येईल, असेही सांगितले.