फातोर्डात एकवटले ‘इंडिया’चे नेते

रणनितीवर चर्चा : दोन्ही जागांवर विजय मिळण्याचा निर्धार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 12:33 am
फातोर्डात एकवटले ‘इंडिया’चे नेते

बैठकीला उपस्थित माणिकराव ठाकरे, अमित पाटकर, युरी आलेमाव, विजय सरदेसाई, अमित पालेकर, कार्लुस फेरेरा, व्हेंझी व्हिएगस, जितेश कामत, जुझे फिलीप डिसोझा व इतर. (संतोष ​मिरजकर)

मडगाव : इंडी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक फातोर्डा येथील एका हॉटेलात पार पडली. यावेळी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई, आपचे संयोजक अमित पालेकर, आमदार कार्लुस फेरेरा, व्हेंझी व्हिएगस, शिवसेनेचे जितेश कामत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलीप डिसोझा व इतर नेते उपस्थित होते.      

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, इंडी आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित आलेले होते. लोकसभा निवडणुकांची यापुढील रणनीती ठरवण्यात आली. आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज रामनवमी दिनी दाखल केले जातील. निवडणुकांसाठी प्रचारात घरोघरी प्रचार, कॉर्नर बैठक, जाहीर सभा व प्रसारासंदर्भात चर्चा करण्यात आली.                         

गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, इंडी आघाडीतील दोन्ही उमेदवारांना लोकांनी स्वीकारले आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी इंडी आघाडीतील सर्व पक्ष सहभागी होतील. आघाडीतील वरिष्ठ नेते प्रचारात सहभागी होतील. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे नेते राज्यात प्रचाराला येतील. भाजपने गोव्यातच नाही तर देशभरात काँग्रेसची, इंडी आघाडीच्या उमेदवारांची मते कमी करण्यासाठी, मतविभागणीसाठी काही उमेदवारांना उभे केलेले  आहेत, असे ते म्हणाले.

नाराज कोणीही नाही, सर्वजण काँग्रेससोबत!

काँग्रेस पक्षाचे कोणतेही नेते नाराज नाहीत. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनीही काँग्रेस पक्षासोबत असल्याचे सांगितले आहे. काहींना उमेदवारी मिळाली नाही म्हणून वाईट वाटू शकते. पण विजय भिके, सुनील कवठणकर, गिरीश चोडणकर सर्वजण काँग्रेससोबत आहेत, असे प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी सांगितले.