विदेशातून पार्सलद्वारे मागविले ड्रग्ज

इटालियनाला हरमलमध्ये अटक : मुंबई कस्टमची कारवाई; हशीष, मारिज्युआना, एलएसडी ड्रग्ज जप्त

Story: प्रसाद शेट काणकोणकर |
16th April, 07:00 am
विदेशातून पार्सलद्वारे मागविले ड्रग्ज

गोवन वार्ता

पणजी : आंतरराष्ट्रीय पोस्टामार्फत विदेशातून पार्सलद्वारे ड्रग्ज मागविल्याप्रकरणी मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी गिरकरवाडा-हरमल येथे कारवाई करून पिएत्रो बर्टोन्सेली या इटालियन नागरिकाच्या मुसक्या आवळल्या. कस्टमने संशयिताला अटक करण्यासाठी बनावट पार्सल गोव्यात पाठवून कारवाई केली. या प्रकरणी कस्टमने संशयित पिएत्रो बर्टोन्सेली याला ट्रान्झीट रिमांडवर मुंबईत नेले आहे.                   

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील विदेशी पोस्ट आॅफिसमध्ये विदेशातून १४ फेब्रुवारी २०२४ रोजी आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची माहिती कस्टमच्या स्पेशल पोस्टल इंटेलिजेंस ब्रँचला (एसपीआयबी) मिळाली होती. त्यानुसार, एसपीआयबीने अधिक चौकशी केली असता, संबंधित पार्सल गोव्यात गिरकरवाडा-हरमल येथील क्लॅफी अल्फान्सो याच्या नावाने मागविण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, एसपीआयबीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पार्सल उघडले असता, त्यात एकूण १८५ ग्रॅम असलेल्या पार्सलात ४.१२ ग्रॅम एलएसडी सापडले. हा ड्रग्ज व्यावसायिक पद्धतीचा असल्यामुळे एसपीआयबीने पुढील कारवाईसाठी केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) दिल्ली येथील मुख्यालयाकडे ४ एप्रिल रोजी संपर्क साधला व एनसीबीने ५ रोजी  परवानगी दिली. त्यानंतर १२ एप्रिल रोजी बनावट पार्सल तयार करून गिरकरवाडा-हरमल येथे दिलेल्या पत्त्यावर पाठविले.       

याच दरम्यान मुंबई येथील एसपीआयबीचे अधिकारी गौरव मीना याच्या नेतृत्वाखाली पथकाने पार्सलवर नजर ठेवली. त्यानुसार, संबंधित पार्सल हरमल पोस्ट आॅफिसमध्ये पोचल्यानंतर संबंधित क्लॅफी अल्फान्सोचे घर शाेधून काढले व तिची चौकशी केली असता, संबंधित पार्सल आपले पती पिएत्रो बर्टोन्सेलीने मागविल्याची माहिती दिली. त्यानुसार, पथकाने त्याची चौकशी केली असता, तो  हरमल येथील एका रेस्टॉरंटमध्ये असल्याची माहिती मिळाली. पथकाने तिथे जाऊन बर्टोन्सेलीला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता, तिथे ३६ ग्रॅम हशीष, १.५ ग्रॅम मारिज्युआना आणि ०.१८ ग्रॅम १९ बाॅल्ट एलएसडी सापडले. ते जप्त करण्यात आले. दरम्यान, त्याला मुरगाव येथील कस्टममध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्याचा जबाब नोंदवून त्याला १३ रोजी सकाळी ११ वा. अटक करण्यात आली.   

संशयित विदेशातून करत होता ड्रग्जची तस्करी

संशयिताला मुंबईत नेण्यासाठी वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्या. आश्विनी खांदोळकर याच्या समोर  हजर केले. त्यावेळी कस्टमतर्फे विशेष वकील रवीराज चोडणकर यांनी बाजू मांडून न्यायालयात माहिती सादर केली. अटक केलेला संशयित विदेशातून पार्सलमार्फत ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती दिली. त्याला मुंबईत नेऊन अधिक चौकशी करण्याची आवश्यकता असल्यामुळे ट्रान्झिट रिमांडाची मागणी केली. याची दखल घेऊन न्यायालयाने बर्टोन्सेलीला मुंबई नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. या प्रकरणी कस्टमच्या स्पेशल पोस्टल इंटेलिजेंस ब्रँचने (एसपीआयबी)  संशयिताविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून कारवाई केली.