बेछूट वक्तव्ये करून निवडणुका जिंकता येत नाहीत !

सदानंद तानावडेंची विरियातो, खलपांवर टीका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 12:30 am
बेछूट वक्तव्ये करून निवडणुका जिंकता येत नाहीत !

पणजी : बेछूट वक्तव्ये करून निवडणुका जिंकता येत नाहीत, अशी टीका राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्यावर केली. जिंकण्यासाठी आवश्यक असलेले संघटन भाजपकडे असल्यामुळे दोन्हीही मतदारसंघांत भाजप उमेदवारच जिंकतील, असा दावा त्यांनी केला.                   

प्रुडंट वृत्तवाहिनीवरील ‘हेडऑन’ कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपला मत​विभागणी करून जिंकायचे नाही. थेट लढत देऊन यावेळी भाजप उमेदवार जिंकतील. दोन्हीही उमेदवारांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवून देण्याचे नियोजन आणि रणनिती आम्ही आखलेली आहे. त्यादृष्टीने दोन्ही उमेदवारांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून दुसरी फेरीही सुरू आहे, असे तानावडे म्हणाले.                   

२०१९च्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवार नऊ हजार मतांनी पराभूत झालेला होता. त्यावेळी मगो पक्षासह दक्षिण गोव्यातील आमदार भाजपसोबत नव्हते. यावेळी मगोसह दक्षिणेतील दिगंबर कामत, आलेक्स सिल्वेरा, आलेक्स रेजिनाल्ड, उल्हास तुयेकर, बाबू कवळेकर आदींसारखे दिग्गज नेते भाजपकडे आहेत. त्यांचा निश्चित फायदा दक्षिण गोव्यातील उमेदवाराला मिळेल, असे त्यांनी सांगितले.        


श्रीपाद, खलपांबाबत तानावडे म्हणतात... 

प्रचारादरम्यान काहीजण श्रीपाद नाईक यांना प्रश्न विचारत आहे, म्हणून त्यांची लोकप्रियता घटलेली नाही. त्यांची लोकप्रियता अजूनही अबाधित आहे. त्यामुळे यावेळीही तेच जिंकतील.                  

अॅड. रमाकांत खलप यांनी खासदारकीचा गोव्यासाठी वापर केला नाही. शिवाय निधीचाही वापर केला नाही.                   

ज्या पक्षाने खासदार बनवले, त्या मगोला दगा देऊन खलप बाहेर पडले.                   खलप आम्हाला वारंवार चर्चेचे आव्हान देत आहेत. पण चर्चा करत बसण्यास आम्हाला वेळ नाही. खलपांकडे तो आहे.