हरमलच्या ‘स्वीट लेक’मध्ये सांडपाणी सोडले जात असल्याचा संशय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 12:28 am
हरमलच्या ‘स्वीट लेक’मध्ये सांडपाणी सोडले जात असल्याचा संशय

हरमल : हरमल येथील प्रसिद्ध स्थळ आहे स्वीट लेक. मात्र या ​निसर्गरम्य स्वीट लेकचे पाणी दूषित होत असल्याची तक्रार पर्यटकांनी केली आहे.
दरम्यान, निसर्गसुंदर स्वीट लेक एकांतात असल्याने जगभरातले पर्यटक येथे येत असतात. निसर्गाशी देणेघेणे नसलेल्या व्यक्ती, व्यावसायिकांकडून विध्वंस होत असल्याने स्वीट लेक वाचवा चळवळ उभी करावी लागेल, असा इशारा स्थानिक व निसर्गप्रेमींनी दिला आहे.
या ठिकाणी डोंगरावर कुणी तरी धनाढ्य लोकांकडून तात्पुरत्या झोपड्या बांधल्या असून, कदाचित त्याचे सांडपाणी वाहून स्वीट लेक मध्ये झिरपत असावे अशी प्रतिक्रिया पर्यटक ईशान सिंग (दिल्ली) यांनी दिली. त्या दूषित पाण्यामुळे लेकमध्ये स्नान करणे आरोग्यासाठी धोकादायक बनले असून त्वचा रोग होण्याची भीती सिंग यांनी व्यक्त केली आहे.
स्वीट लेकच्या बाबतीत सरकारी अधिकाऱ्यांनी तसेच पंचायतीने धरसोड वृत्ती केल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप स्थानिक तसेच पर्यटकांंनी केला आहे. झोपड्यांच्या खाली स्वीट लेक असून, त्याच्या वरच्या बाजूस असणाऱ्या झोपड्यांंतील सांडपाणी कुठे जाणार, याचा अभ्यास न झाल्याने स्वीट लेक संकटात आहे. त्याला जबाबदार कोण, असा सवाल सिंग यांंनी उपस्थित केला आहे. पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात झोपड्यात वास्तव्य होत असते. त्यातील सांडपाणी थेट लेकमध्ये येत असल्याने, पाणी दूषित होत असून पाण्यास दुर्गंधी येत असल्याचे सिंग यानी सांगितले. मुळात, लेकच्या वरील बाजूला बांधकामाला परवानगी देणे उचित नाही. त्याचे सांडपाणी निचरा होण्यासाठी उपाययोजनेची पाहणी करण्याची गरज होती. त्यासाठी आवश्यक पाहणी न केल्याने लेक कदाचित अखेरच्या घटका मोजत आहे, अशी चिंंता सिंग यांनी व्यक्त केली.