अपघात कधी थांबणार ?

गोव्यातील सरळ रस्त्यांवर होणारे अपघात, ग्रामीण रस्त्यांवर होणारे अपघात आणि धोकादायक रस्त्यांवरील होणारे अपघात अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून रस्त्यांवरील अपघात कशा प्रकारे नियंत्रणात आणता येतील, त्यासाठी उपाय आखण्याची गरज आहे.

Story: संपादकीय |
16th April, 12:08 am
अपघात कधी थांबणार ?

गेल्या वर्षीसारखीच यावर्षीही गोव्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. एप्रिल महिन्यातच पहिल्या पंधरा दिवसांमध्ये राज्यात झालेल्या अपघातांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर गंभीर जखमी होऊन नंतर इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू आलेल्यांची संख्या अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे १९ पेक्षा जास्त जणांच्या मृत्यूला अपघात कारणीभूत ठरले असू शकतात. यावर्षी साडेतीन महिन्यांमध्ये सुमारे १०० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अर्थात जवळपास दिवासाला एक अपघाती मृत्यू होत आहे. राज्यातील रस्त्यांचा विस्तार होत असतानाही अपघात थांबत नाहीत. वाहतूक पोलीस आणि वाहूतक खाते यांनी संयुक्तपणे रस्त्यांवरील गस्त वाढवण्याची गरज आहे. दंडात्मक कारवाई करण्यापलीकडे दुसरे उपाय या दोन महत्त्वाच्या खात्यांकडून होत नाहीत. नियम तोडणाऱ्यांचे परवाने रद्द करतानाच परवाना नसताना वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. विशेष म्हणजे २०२३ मधील रस्त्यांवरील अपघातांची आकडेवारी पाहिली तर पोलिसांच्या मते, गोव्यात सरळ रस्त्यांवरच जास्त अपघात होतात असे आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांतील अपघात पाहिले तर स्वयं अपघातांत अनेकांनी जीव गमावला. दुचाकी चालकांच्या अपघातांमध्ये गेल्या वर्षीही वाढ होती आणि सध्या यावर्षीही वाढ होताना दिसते. गोव्यात अपघातांची वाढणारी संख्या, ही चिंतेची बाब आहे. ते रोखण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत, असे दिसत नाही. गेली अनेक वर्षे वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जातात. काहीवेळा सरकारनेही अपघातांची ठिकाणे शोधून तिथे दुरुस्त्या करण्यासाठी पुढाकार घेतला, पण अपघात थांबत नाहीत.

२०२३ मध्ये गोव्यात २,८४६ अपघातांची नोंद झाली, ज्यात सुमारे २९० जणांना जीव गमवावा लागला. त्यापूर्वी २०२२ मध्ये ३,०११ अपघात तर २०२१ मध्ये २,८४९ अपघातांची नोंद आहे. म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वी जे अपघात व्हायचे त्यांच्या संख्येमध्ये चांगली घट झाली आहे. पण अपघातांमधील मृत्यू कमी होत नाहीत. २०२२ मध्ये २७१ अपघाती मृत्यू तर २०२१ मध्ये २२६ अपघाती मृत्यू होते. दर आठवड्याला गोव्यात पाच ते सहा लोक अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात. सुमारे २०० ते २३० अपघात दर महिन्याला नोंद होतात. शेकडो लोकांचे बळी जातात, शिवाय हजारो लोक अपघातांमध्ये जखमी होऊन दिव्यांग होतात. गोव्यातील अपघातांविषयी प्रसारमाध्यमे पोटतिडकीने लिहीत असतात, पण हे अपघात रोखण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत सरकारी यंत्रणा विशेष काही करताना दिसत नाही.

गोव्यात रस्त्यांचे चांगले जाळे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांचा विस्तार आणि रुंदीकरण होत आहे. महामार्गांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. असे असतानाही गोव्यातील रस्त्यांवर होणारे अपघात थांबत नाहीत. गोव्यातील सरळ रस्त्यांवर होणारे अपघात, ग्रामीण रस्त्यांवर होणारे अपघात आणि धोकादायक रस्त्यांवरील होणारे अपघात अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून रस्त्यांवरील अपघात कशा प्रकारे नियंत्रणात आणता येतील, त्यासाठी उपाय आखण्याची गरज आहे. रस्त्यांवर अपघात झाल्यानंतर अनेकवेळा रुग्णवाहिका वेळेवर आली नाही, अशा प्रकारची एक तक्रार कायम असते. त्यावर मात करण्यासाठी अपघातस्थळी त्वरित वैद्यकीय मदत कशी पोहचेल आणि सुसज्ज रुग्णवाहिका कशा प्रकारे त्या ठिकाणी पोहचून जखमींना आवश्यक ती मदत देईल, यासाठी नियोजनाची गरज आहे. त्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे, महामार्ग, जिल्हा रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या परिसरात विशेष रुग्णवाहिका ठेवणे, अपघातांतील लोकांना तातडीने मदत मिळेल यासाठी रुग्णवाहिकेसोबतच मदत करणारे विशेष कर्मचारी नियुक्त करणे, अशा गोष्टींची गोव्यात खरी आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने गोव्यातील रस्त्यांवर अपघात होऊन दरवर्षी तीनशेच्या आसपास लोक मृत्युमुखी पडतात, ते थांबवण्यासाठी सरकारने अपघात काळात मदतीला पोहचणारी व्यवस्था तयार ठेवावी लागेल. अपघातांमधील रुग्णांवर उपचारासाठी सर्व तालुक्यांतील सरकारी इस्पितळांत तसेच जिल्हा इस्पितळांमध्ये चांगल्या सुविधा देण्याची गरज आहे. अपघातांत गंभीर जखमी झालेल्यांना थेट गोवा वैद्यकीय महाविद्यालयात किंवा खासगी इस्पितळात नेण्यावाचून पर्याय राहत नाही. अपघातानंतर इस्पितळात नेताना अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. या गोष्टी लक्षात घेऊन रस्त्यांमध्ये सुधारणा, रस्त्यांवर सीसीटीव्हीचे जाळे तसेच अपघात रोखण्यासह अपघातांमधील जखमींवर चांगले उपचार करता येतील, यासाठी सुविधा उभारण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.