नव्या ‘सिक्सर किंग’ने ठोठावले आयपीएलचे दरवाजे

Story: क्रिडांगण |
16th April, 12:04 am
नव्या ‘सिक्सर किंग’ने ठोठावले आयपीएलचे दरवाजे

नेपाळी क्रिकेटपटू दीपेंद्र सिंग ऐरीने शनिवारी एसीसी पुरुष टी-२० प्रीमियर कपमध्ये कतार विरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार ठोकत साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यामुळे दीपेंद्र सिंग लवकरच आपल्याला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघातर्फे खेळताना दिसू शकतो. दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आपल्या देशात परतला आहे आणि तो संघात परतण्याची​ शक्यता दिसत नाही. दीपेंद्रला मिचेल मार्शच्या जागी संघात संधी दिली जाऊ शकते. जर दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने आयपीएल २०२४ हंगामात मार्शच्या जागी दीपेंद्र सिंग ऐरीला संधी दिली, तर दीपेंद्र सिंग नेपाळकडून आयपीएलमध्ये खेळणारा दुसरा खेळाडू ठरू शकतो. याआधी, संदीप लामिछानेने २०१८ साली दिल्ली फ्रँचायझीकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

दीपेंद्रबद्दल सांगायचे तर, या नेपाळी क्रिकेटपटूचा जन्म २४ जानेवारी २००० रोजी झाला. ऑगस्ट २०१८ मध्ये, नेदरलँड विरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दीपेंद्र नेपाळच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एेरीने मंगोलियाविरुद्ध फक्त ९ चेंडूत नाबाद ५० धावा करून टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला. आता तो एसीसी प्रीमियर कपमध्ये कतारविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारणारा तिसरा क्रिकेटर बनला आहे. 

युवराज सिंगने टी-२० विश्वचषक २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूत ५० धावा करून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले होते. दीपेंद्रने गेल्या वर्षी १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगोलियाविरुद्ध ९ चेंडूत अर्धशतक ठोकून युवीचा विश्वविक्रम मोडला होता. तसेच दीपेंद्र आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एका षटकात ६ षटकार मारणारा जगातील फक्त तिसरा खेळाडू ठरला आहे. युवराज सिंगने २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता, तर किरॉन पोलार्डने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एका षटकात ६ षटकार मारले होते. दीपेंद्रने हा कारनामा केल्यामुळे क्रिकेट विश्वाला नवा सिक्सर ​किंग मिळाला आहे आ​णि त्याने आयपीएलचेही दरवाजे ठोठावले आहे. कोणतीही आयपीएलची फ्रेंचायजी त्याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक आहे. पण सध्या दिल्लीच्या संघात एका विदेशी खेळाडूची जागा रिक्त झाल्यामुळे दिल्लीच्या संघात त्याची वर्णी लागू शकते. दीपेंद्र दिल्लीच्या ताफ्यात सामील झाल्यास संघाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण मिचेल मार्शने आयपीएल २०२४ मध्ये ४ सामने खेळले आणि केवळ ६१ धावा करून १ बळी टिपला. ४ सामन्यांत त्याच्या सर्वांधिक २३ धावा होत्या. दीपेंद्रने दोन वेळा ३०० च्या सरासरीने अर्धशतक ठोकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही खेळाडूला हा कारनामा करता आलेला नाही. त्यामुळे हा नवा सिक्सर किंग आयपीएलमध्ये किती विक्रम करतो हे येणारा काळच सांगेल.

प्रविण साठे

(लेखक दै. गोवन वाार्तचे उपसंपादक आहेत.)