भूत शुद्धी : पंचतत्वांची शुद्धी का करावी लागते ?

तुमच्यामध्ये असलेली ही पाच तत्वे, ज्यांपासून हे शरीर बनलेले आहे, त्यांच्यावर खूप प्रभाव झालेला असतो. माहितीचा एक थर, ज्याला आपण सर्वसाधारणपणे कर्म पदार्थ म्हणतो, तो जमा झालेला असतो. त्याच्याशिवाय ही पंचतत्व तुमच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीने कार्य करू शकली नसती. जर ही विशिष्ट माहिती नसती तर प्रत्येक मनुष्य एकसमान बनला असता.

Story: विचारचक्र |
15th April, 05:53 am
भूत शुद्धी : पंचतत्वांची शुद्धी का करावी लागते ?

प्रश्न : सद्गुरू, तुम्ही म्हणालात की योगाचा सर्वात मूलभूत प्रकार म्हणजे भूतशुद्धी किंवा आपल्या शरीररचनेतील पंचतत्वांची शुद्धी. जर ही पंचतत्व मुलभूत घटक असतील ज्यापासून सर्व काही बनले आहे, तर मग ती अशुद्ध कशी होऊ शकतात?

सद्गुरू : तुम्ही जर गटारातून थोडे पाणी घेतले तर तुम्हाला वाटेल ते अशुद्ध आहे, पण ते तसे नाही. प्रत्यक्षात, जीवनासाठी- असंख्य जीवांसाठी - ते जास्त पोषक आहे, तुम्ही ज्याला शुद्ध पाणी म्हणता त्याहीपेक्षा जास्त. तुम्ही जे बाटलीबंद पाणी पिता त्यापेक्षा गटारातल्या पाण्यामध्ये खूप जास्त जीवन आहे. फक्त एवढेच आहे की ते तुमच्यासाठी पोषक नाही. मनुष्याच्या समजुतीमध्ये, जे आपल्याला पोषक आहे त्याला आपल्या भाषेत आपण शुद्ध पाणी म्हणतो. कित्येक जीवांसाठी गटारातील पाणी खूप शुद्ध आहे. तुम्ही ज्याला शुद्ध पाणी म्हणता त्यामध्ये हे सर्व जीव मारून टाकलेले असतात. इतर सर्व जीव तुमच्या बाटलीबंद पाण्याला शुद्ध पाणी समजत नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते निर्जीव पाणी आहे. त्याचप्रमाणे तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल, बरीच रसायने जी औषधांमध्ये वापरली जातात, त्याचे दोन प्रकार असतात- एक औद्योगिक वापरासाठीचे आणि दुसरे औषधांमध्ये वापरासाठीचे, कारण मनुष्यासाठी पोषक असणारा प्रकार आणि इतर कामांसाठी वापरला जाणारा प्रकार, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. याचा अर्थ असा नाही की जे औद्योगिक वापरासाठी उपयुक्त आहे ते अशुद्ध आहे. फक्त एवढेच आहे की ते अशा स्थितीत आहे की या मनुष्य जीवनासाठी ते फार चांगले काम करू शकणार नाही.

म्हणून ज्यावेळी आपण पंचतत्वांच्या संदर्भात बोलतो त्यावेळी आपल्यासाठी काय जास्त पोषक आहे, या अर्थाने आपण बोलतो. या अर्थाने आपण पंचतत्वांचे शुद्धीकरण करणे गरजेचे असते. सृष्टीतील सर्वकाही या पाच तत्वांचा खेळ आहे, अब्जावधी जीव याच पंचतत्वांची अभिव्यक्ती आहेत. जर त्यांनी वेगवेगळे गुणधर्म आणि शक्यता घेतल्या नसत्या तर हे सर्व शक्य झाले नसते. ती नैसर्गिकरीत्या ग्रहणक्षम आहेत. तुम्ही श्वासावाटे जी हवा घेता, जे अन्न खाता, जे पाणी पिता - (आणि इतर दोन तत्व, अग्नी आणि आकाश, आपण बाजूला ठेऊ कारण ते फारसे तुमच्या अनुभवामध्ये नसतात)- ते सर्व केवळ एखादा विचार, भावना किंवा उर्जेने प्रभावित होऊ शकते.

कर्म पदार्थापासून सुटका

तुमच्यामध्ये असलेली ही पाच तत्वे, ज्यांपासून हे शरीर बनलेले आहे, त्यांच्यावर खूप प्रभाव झालेला असतो. माहितीचा एक थर, ज्याला आपण सर्वसाधारणपणे कर्म पदार्थ म्हणतो, तो जमा झालेला असतो. त्याच्याशिवाय ही पंचतत्व तुमच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीने कार्य करू शकली नसती. जर ही विशिष्ट माहिती नसती तर प्रत्येक मनुष्य एकसमान बनला असता.

उदाहरणार्थ, समजा एक स्त्री केळ खाते. काही तासात ते केळ स्त्री बनते. जर पुरुषाने केळ खाल्ले तर ते केळ पुरुष बनते. जर गायीने केळ खाल्ले तर तेच केळ गाय बनते. केळ्यामध्ये इतकी बुद्धी नाही की ते स्वतःला स्त्री, पुरुष, गाय किंवा जो कोणी प्राणी ते खाईल, ते बनेल. तुमच्यामध्येच असलेली एक विशिष्ट माहिती त्या केळ्याचे रूपांतर स्त्री, पुरुष, गाय किंवा जो कोणी असेल, त्यामध्ये करते. तुम्ही ज्याला “मी” म्हणता, तो मुळात ठराविक माहितीचा एक संचय आहे. आणि तो तुमच्यामध्ये या पंचतत्वांच्या मार्फत स्थापन केला जातो, कारण इथे जे काही आहे ते या पंचतत्वांशिवाय दुसरे काही नाही.

या पंचतत्वांची शुद्धी म्हणजे त्यांच्यामध्ये जी माहिती आहे किंवा कर्म पदार्थ साठवले आहे त्यापासून ते मुक्त करणे. हे जर केले नाही तर तुमचे स्वतःच व्यक्तित्व दृढ बनेल पण तुम्ही तुमच्यासाठी जी मर्यादा घालून ठेवली आहे ती ओलांडून जाणे काय असते ते तुम्हाला कधीच कळणार नाही. ही मर्यादा अस्तित्वाने घातलेली नाही. ही मर्यादा तुम्ही स्वतःच स्वतःला घातली आहे. जी मर्यादा तुम्ही घातली आहे ती तुम्ही स्वतः जर पार करू शकत नसाल तर ते मूर्खपणाचे जगणे आहे. तुम्ही स्वतःसाठी एक मर्यादा घालून ठेवली आहे ज्याचे कारण तुम्हालाही माहीत नाही, आणि कालांतराने तुम्ही ती ओलांडूही शकत नाही आणि मग तुम्ही जाहीरपणे सांगायला सुरुवात करता की “मी असाच आहे!”. हे वाक्य सर्वसाधारणपणे, सगळीकडे ऐकायला मिळते. तुम्ही जर कोणाला काही मर्यादा ओलांडून जाण्याविषयी सांगितले तर ते म्हणतात, “नको, मी हा असाच आहे.” तुम्ही असे नाही आहात, तुम्ही स्वतःला तसे बनवले आहे.

म्हणून मनुष्याच्या संदर्भात आपण म्हणतो की शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. तुम्ही असेच बाहेर जाऊन माती खाऊ शकता का, नाही ना? परंतु गांडूळ आणि इतर बरेच प्राणी ती खात आहेत आणि फोफावत आहेत. परंतु मनुष्य प्राणी तशा प्रकारे माती खाऊ शकत नाही. तिचे रूपांतर भाजीपाला, फळ किंवा तत्सम काही यामध्ये झाले पाहिजे, तरच ते तुम्ही खाऊ शकता, कारण मनुष्याच्या शरीर रचनेसाठी ते पोषक असले पाहिजे. परंतु असे पुष्कळ प्राणी आहेत जे, माती जशी आहे, त्यामध्ये खूष आहेत, पाणी जसे आहे त्यामध्ये खूष आहेत, हवा जशी आहे त्यामध्ये खूष आहेत. म्हणून शुद्धीकरण हे मुळात मनुष्याच्या संदर्भामध्ये आहे, त्या पंचतत्वांच्या संदर्भात नाही.


सद् गुरू, ईशा फाऊंडेशन