गाझामधील बळी, जखमींचा आकडा वाढता वाढे!

Story: विश्वरंग | |
13th April, 12:43 am
गाझामधील बळी, जखमींचा आकडा वाढता वाढे!

गाझामध्ये ताबडतोब युद्धबंदी करण्यात यावी आणि सर्व ओलिसांची बिनशर्त सुटका करावी, असा ठराव युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये गेल्या महिन्यात मंजूर करण्यात आला होता. पण, गाझामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला बॉम्बवर्षाव थांबण्याची चिन्हे नाहीत, तर दुसरीकडे बळी आणि जखमींचा आकडा वाढत चालला आहे.

या युद्धामुळे गाझा पट्टीतील पायाभूत सुविधा, इमारती जवळपास उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि परिणामी रहिवाशांना दक्षिणेकडच्या राफा शहरात स्थलांतरित व्हावे लागले आहे. या भागामध्ये येत्या काही काळात भीषण अन्नदुर्भिक्ष्य भासण्याची शक्यता असल्याचा इशारा गेल्या महिन्यात युनायटेड नेशन्सने दिला होता. ७ ऑक्टोबर २०२३ ला हमासने अचानक हल्ला केला ज्यामध्ये इस्रायलच्या आकडेवारीनुसार १२०० लोक - मुख्यतः सामान्य नागरिक मारले गेले. दरम्यान, या हल्ल्यानंतर युके, अमेरिका आणि युरोपियन युनियनने हमासला दहशतवादी संघटना ठरवले आहे.

७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्यावेळी २५३ जणांना ओलीस धरले गेले. यापैकी जवळपास १३० बंधक गाझामध्ये ठेवण्यात आल्याचा अंदाज आहे तर ३४ जणांचा मृत्यू झाल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. इतर इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या पहिल्या हल्ल्यापासून आतापर्यंत ६०० इस्रायली सैनिकांना मृत्यू झाला असून ऑक्टोबर अखेरीस जमिनीवरील हल्ल्याची कारवाई सुरू झाल्यापासून २५६ जण मारले गेले आहेत.

युनायटेड नेशन्सने १ मार्चला प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार गाझामध्ये इस्रायली सैन्यामुळे आतापर्यंत ९ हजार महिलांचा मृत्यू झाला. पण, हा आकडाही प्रत्यक्ष मृत्यूंपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. कारण ढिगाऱ्यांखाली अजूनही अनेक मृतदेह आहेत. गाझा युद्धामुळे आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याचे युनायटेड नेशन्सच्या युनिसेफने म्हटले आहे.

पॅलेस्टाईन आरोग्य खात्याने दिलेली आकडेवारी कितपत योग्य आहे याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शंका व्यक्त केली होती, पण ही आकडेवारी विश्वासार्ह असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले होते.

गाझापट्टीतील २३ लाख लोकांवर स्वतःचे घर सोडून पळ काढण्याची पाळी आली आहे. सध्या सुरू असलेले युद्ध, त्यामुळे उद्ध्वस्त झालेली घरे आणि परिसर, अन्न, पाणी, इंधन, वीज या सगळ्यांचा तुटवडा या अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्स (आयएफजे)च्या आकडेवारीनुसार या युद्धात आतापर्यंत ९९ पॅलेस्टिनी पत्रकार आणि माध्यम कर्मचारी, ४ इस्रायली आणि ३ लेबनीज पत्रकार मारले गेले आहेत. यासोबत १६ पत्रकार जखमी झाले असून, ४ बेपत्ता आहेत आणि गाझातल्या युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या २५ पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. इस्रायलच्या लष्करासोबतच राहायचे कबूल करत इतर अटी मान्य केल्या तरच पत्रकारांना गाझामध्ये शिरता येते. या पत्रकारांना इस्रायलच्या सैन्यासोबतच असावे लागते आणि बातम्या छापण्याच्या आधी त्या दाखवून तपासून घ्याव्या लागतात. गाझामध्ये मदतकार्य करणाऱ्या १९६ जणांचा ऑक्टोबरपासून मृत्यू झाल्याचे अमेरिकेच्या मदतीने चालवण्यात येणाऱ्या एड वर्कर सिक्युरेटी डेटाबेसने म्हटले आहे. मदतकार्य करणाऱ्या लोकांबद्दलच्या घटना, गुन्हे यावर ही संस्था लक्ष ठेवते.

- सुदेश दळवी (लेखक ‘दै. गाेवन वार्ता’चे उपसंपादक आहेत.)