गोव्याची बॅडमिंटनपटू तनिषा क्रास्टो ‘पॅरिस २०२४’ ऑलिम्पिकसाठी पात्र

भारताचे प्रतिनिधित्व करणारी २३वी गोमंतकीय


13th April, 12:26 am
गोव्याची बॅडमिंटनपटू तनिषा क्रास्टो ‘पॅरिस २०२४’ ऑलिम्पिकसाठी पात्र

क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्याची बॅडमिंटनपटू तनिषा क्रास्टोने ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ‘पॅरिस २०२४’साठी ती अश्विनी पोनप्पासह महिला दुहेरीत खेळताना दिसणार आहे.
जुलैमध्ये तनिषा पॅरिसमध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती २३वी गोमंतकीय ठरेल. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करणारी आणि नंतर ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवणारी तनिषा अलीकडच्या काळातील एकमेव गोमंतकीय खेळाडू आहे. अश्विनी पोनप्पाचे हे तिसरे ऑलिम्पिक असेल, तर तिची जोडीदार तनिषा या स्पर्धेत पदार्पण करेल.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवल्याबद्दल तनिषाचे खूप अभिनंदन. संपूर्ण गोवा आणि देश तुला पाठिंबा देत आहे. मला खात्री आहे की, तू अत्युच्च कामगिरी करून देशासाठी पदके घेऊन येशील. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा !
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
हैदराबादमधील प्रसिद्ध पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमधील प्रवेशानंतर तिने आपला खेळ उंचावला. त्यानंतर तिने भारतीय संघात प्रवेश केला. तेव्हापासून ती आपल्या खेळाने गोव्यासह देशाचे नाव उज्ज्वल करत आहे.
कोण आहे तनिषा क्रास्टो ?
दुबईत जन्मलेल्या तनिषाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात आखाती देशात केली.
वयाच्या १५ व्या वर्षी ती भारतात परतली.
२०१७ पासून ती गोव्याचे प्रतिनिधित्व करत आहे.
ज्युनियर आणि वरिष्ठ गटांमध्ये तिने अनेक स्पर्धांत विजेतेपद पटकावले आहे.
तिचे वडील क्लिफर्ड क्रास्टो मडगाव येथील, आई लोटली येथील आहे.
क्रास्टो कुटुंब असोळणा आणि चिंचणी येथे मुक्कामी आहे.
पोनप्पा-तनिषाची कौतुकास्पद कामगिरी
ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी पोनप्पा आणि तनिषा यांनी गुवाहाटी मास्टर्स सुपर १००, अबू धाबी मास्टर्स सुपर १०० आणि नॅनटेस इंटरनॅशनल चॅलेंज या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांचे इतर उल्लेखनीय निकाल म्हणजे सय्यद मोदी सुपर ३०० आणि ओडिशा ओपन सुपर १०० मध्ये आले. जेथे ते अंतिम फेरीत पोहोचले आणि त्यांनी इंडोनेशिया मास्टर्स सुपर ५०० मध्ये उपांत्य फेरी आणि मलेशिया ओपन सुपर १००० आणि स्पेन मास्टर्स सुपर ३०० मध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.