असोडे-गवाणे वळणावर भीषण अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू


13th April, 12:18 am
असोडे-गवाणे वळणावर भीषण अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : सत्तरी तालुक्यातील असोडे-गवाणे मार्गावरील धोकादायक वळणावर बोलेरो मालवाहू वाहन आणि मालवाहू रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात म्हावळींगे-डिचोली येथील रिक्षाचालक आनंद चारी यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायं. ५ च्या सुमारास घडला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. आणखी दोघांना मार बसला असून त्यांना वाळपईतील सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल केले आहे.
आनंदा चारी हे रिक्षा (क्र. जीए ०४ टी ४४००) घेऊन असोडेहून गवाणेकडे चालले होते. एका धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या बोलेरो (क्र. जीए ०४ टी ६७३४) वाहनाने रिक्षाला समोरून धडक दिली. या अपघातात रिक्षाच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. आनंदा चारी रिक्षातच चिरडले गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. आनंदा चारी यांना बाहेर काढण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला; मात्र ते आत अडकले होते. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी आनंद यांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून त्यांना वाळपईच्या सामाजिक रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वाळपई पोलीस उपनिरीक्षक अल्लाउद्दीन हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. अपघातातील जखमींना वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल केले आहे. आनंदा चारी यांचा मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवला आहे. वाळपई पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा