लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीचा खून

वाडे दाबोळी येथील दुर्घटना : पोलिसांकडून तपासासाठी पथके तयार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्त |
12th April, 04:47 pm
लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीचा खून

वास्को : वाडे-दाबोळी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात साडेपाच वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचा संशय मुलीच्या आईने व्यक्त केला आहे. शवचिकित्सा अहवालातून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तपासासाठी काही पथके तयार केली आहेत. २० कामगारांची पोलिसांनी चौकशी केली आहे. पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग आणि अधीक्षक सुनीता सावंत यांनी तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. 

मिळालेल्या शुक्रवारी (दि.१२) पहाटे ३ वाजता निर्माणाधीन इमारतीत बांधकाम करणाऱ्या कामगारांनी आपल्या मुलीला बेशुद्ध अवस्थेत, दाबोळी चिखली उपजिल्हा इस्पितळात तपासणी दाखल केले. इस्पितळातील डॉक्टरांनी येथे आणण्यापूर्वी त्या मुलीचा मृत्य झाल्याचे घोषित केले. सदर माहिती पोलिसांना देण्यात आली.  वास्को पोलिसांनी त्वरीत उपजिल्हा इस्पितळात जाऊन त्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचा पंचनामा केला. तसेच ज्या ठिकाणी त्या मूलीचा संशयास्पद मृत्यू झाला त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी तपासणी केली.

 दरम्यान सोशल मीडियावर त्या साडे पाच वर्षीय मुलीच्या मातेने आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती दिली.  यामुळे या प्रकरणाची सर्व धूरा दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सौ. सुनिता सावंत यांनी आपल्या हाती घेतली. पोलिस अधीक्षक सौ. सावंत, मुरगाव तालुका पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी वाडे त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.  इमारतीच्या मागे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे असल्याने  मुलीचा एखाद्या  विषारी प्राण्यांनी चावा घेतला असावा असा  संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  पोलिसांनी मुलीच्या आई - वडीलांची जबानी घेतली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे तसेच इतर कामगारांची चौकशी पोलिस करीत असल्याची माहिती अधीक्षक सौ. सुनिता सावंत यांनी दिली.

दरम्यान वास्को पोलिस स्थानकांवर पोलिस महानिरीक्षक ओमविर सिंग व इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या नेतृत्वाखाली साडे पाच वर्षाच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सुरू आहे.