उसगाव येथे बस-कारच्या धडकेत चिमुकलीसह सात जण जखमी

रुग्णवाहिका दीड तास उशिराने आल्याने नागरिक संतप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th April, 12:35 am
उसगाव येथे बस-कारच्या धडकेत चिमुकलीसह सात जण जखमी

फोंडा : उसगाव येथील नेस्ले कंपनीजवळ प्रवाशी बस व कारमध्ये झालेल्या अपघातात ६ महिन्याची चिमुकली गंभीर जखमी झाली. अपघातात जखमी झालेल्या कारमधील इतर ६ जणांना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. अपघातात प्रवाशी बसमधील सुमारे १०-१२ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. रुग्णवाहिका दीड तासानंतर पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्याने जमावातील लोकांनी संताप व्यक्त केला.

जीए १२- टी- ६९१२ क्रमांकाची बस संध्याकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास फोंडा येथून वाळपई येथे जात होती. नेस्ले कंपनीसमोरील वळणावर समोरून सुसाट वेगाने धावणारी जीए - ०६- टी - ६०५९ क्रमांकाची कार चुकीच्या दिशेने जावून प्रवाशी बसला धडकली. यात कारमधील ७ जण जखमी झाले तर बसमधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. जखमींना स्थानिक लोकांनी खासगी वाहनातून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर कारचालक शंकर चौगुले (४८), अमृता चौगुले (२४), पूजा चौगुले (४६), पल्लवी आजगावकर (८), रेणुका आजगावकर (२९, सर्व जण दाबोळी - वास्को) व सहा महिन्याच्या मुलीला अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले.

अपघातानंतर स्थानिक लोकांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला. पण स्थानिक लोकांनी जखमींना मिळेल त्या खासगी वाहनातून इस्पितळात दाखल केले. अपघात स्थळी पोहोचलेल्या दोन १०८ रुग्णवाहिका जखमींना इस्पितळात दाखल केल्याने माघारी परतल्या. अपघातात ६ महिन्याची मुलगी गंभीर जखमी झाली होती. १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सुमारे दीड तास जखमींना आरोग्य केंद्रात ठेवावे लागले. फोंडा येथील केतन भाटीकर व राजेश वेरेकर यांनी जखमींना गोमेकॉत नेण्यासाठी आपल्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. पण एकाच वेळी ३ सरकारी १०८ रुग्णवाहिका आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर जखमींना त्वरित गोमेकॉत दाखल करण्यात आले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

कार चालकाला आली झोप!

वास्को येथील चौगुले व आजगावकर कुटुंबीय बेळगाव परिसरात देवदर्शनाला गेली होती. संध्याकाळी माघारी परतताना कार चालकाला झोप आल्याने अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.