तेरा मन दरपन

माणसाचं मन एक देवालाही न सुटलेलं कोडं आहे. त्याचा ठाव सापडला असा कुणीही जगात सापडणार नाही. याची थोरवी गाता गाता मोठमोठ्या कवी लेखकांची लेखणी अपुरी पडते. त्यामुळे आमच्या सारखे पामर त्याची काय महती सांगणार? ज्याचा थांग पत्ता लागत नाही असं हे मन.

Story: मनातलं |
05th April, 09:58 pm
तेरा मन दरपन

बहिणाबाई म्हणतात तसे, 'आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळात. इतके जलद की एखाद्या यानाच्या गतीपेक्षा वेगवान याची गती, न मोजता येण्यासारखी. आपण विचार करत असतो, तेव्हा मन असते कुठेतरी आणि क्षणार्धात पोचते भलतीकडे. कधी कधी तर साता समुद्रापलीकडे असलेल्या एखाद्या ठिकाणी जाऊन पोहचते. त्याला ना लागतो व्हिसा, ना पासपोर्ट, ना विमान प्रवासाचा खर्च. अशी ही मनाची व्याप्ती सारे अवकाश व्यापते. त्याला हवे तसे आभासी जग निर्माण करता येते. एक फँटसी रचली की त्यात मन गुंतून रहाते आणि त्यातच आपले सुख, आपली इच्छापूर्ती शोधते. कधी मन चकाकणाऱ्या स्वच्छ नितळ आरशासारखे तर कधी उदास, वैतागलेले असते. त्यावेळी तुमचा चेहरा त्या भावना व्यक्त करतो.

दररोज दिवसातून एकदा तरी आपण आपल्याला आरशात न्याहाळत असतो. मनासारखा साजशृंगार जमलाय की नाही याची फेरतपासणी करत असतो पण हे सारे झाले बाह्योपचार. पण खरंच स्वत:ला नीट पारखायचे असेल, तर प्रत्येकाने आपल्या मनाच्या आरशात डोकावून बघायला पाहिजे. मनावर साचलेली नको असलेली धूळ, जळमटे काढून तो आरसा स्वच्छ पारदर्शी केला पाहिजे आणि असे व्यक्तिमत्त्व पाहून आपणच आपल्यावर खूश होतो व मनात एक सकारात्मकता जागी होऊ लागते. मनाची प्रसन्नता जग सुंदर आहे हे दाखवून देते. 

लहानपणापासून आपण आरशात स्वत:ला बघत बघतच मोठे झालेले असतो. लहानपणीची ती दोन घट्ट वेण्या-रिबीन लावलेली 'ती' पुन्हा पुन्हा आपल्या आईने नीट वेणी घातली की नाही, टिकली नीट लावली की नाही, पावडर जरा जास्तच लावायला पाहिजे, गोरी गोरी पान फुलासारखी छान दिसतेय ना मी? या गोष्टी आरशात बघत स्वत:च्या मनाशी बाळगून असते. ती मोठी होते. यौवनात पदार्पण केलेली 'ती' स्वत:च्या रुपावरच फिदा होत असते. ते रूपडं डोळ्यात साठवत असते कारण 'मी'च माझ्या रूपाची राणी असे तिचे मन तिला सांगत असते. जस जसं वय वाढत जातं तसं ती शरीराची गोलाई, आकारात झालेला बदल, त्या त्या रुपाशी समरस होत ती तिलाच नव्याने भेटत असते. पण जेव्हा वय उतरणीला लागते, शरीरातले बदल जाणवू लागतात, चेहऱ्यातले फेरफार, सुरकुत्या, केस रुपेरी होणं अशा गोष्टी तिला अस्वस्थ करू लागतात. मग जावं का पार्लरला? लावावा का केसांना कलप? हा विचार ती डोळे मिटून करू लागते तेव्हाच तिला जाणवतो तो तिच्या मनाचा आरसा. जो पहायला ती विसरलेलीच असते. डोळे मिटून शांतपणे त्या मनाच्या आरशात डोकावून पाहताना 'ती' स्वत:लाच भेटते. आता ती वयानुरूप अनुभवाने प्रगल्भ झालेली असते. तो आरसा तिला तिचं खरं रूप दाखवतो. मनाचा आरसा दाखवतो तिला तिचीच वेगवेगळी प्रतिबिंबं. जी तिने आपल्या मनाच्या अल्बममध्ये निगुतीने जपलेली असतात

आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला नवनवीन संकटांना तोंड देताना अनेक सुख-दुखांना सामोरे जावे लागते. त्यावेळी तुमचे वागणे कसे होते? याचे प्रतिबिंब दाखवतो तो मनाचा आरसा. तुम्ही कुठे चुकला, कुठली गोष्ट बरोबर केली, काय करायला हवे होते, काय नको होते याची शहानिशा करणारे मन जागे होऊन आपल्याला खरा आरसा दाखवते. मानवी जीवन हे अनेक कंगोऱ्यांनी नटले आहे. हल्लीच्या युगात मनाला या सर्व पातळ्यांवर काम करावे लागते. त्या त्या क्षेत्रात त्याची प्रगती मनाच्या मार्गदर्शनाद्वारे होत असते. म्हणून प्रत्येकाकडे आपल्या अंतर्मनाचा आरसा असायला हवा. जो आपल्याला खरा मार्ग दाखवेल. आपण आरशात पाहतो ते आपले बाह्य रूप असते. 

मनाला जाणिवा असतात, भावभावना असतात त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना मनाचा कौल आधी घेतला पाहिजे. मनात आठवणी साचवून ठेवता येतात, त्या स्मृती वेळोवेळी तुम्हाला जीवनातली पायवाट चालायला मार्गदर्शक ठरतात. आपल्या जीवनातल्या केल्या गेलेल्या चांगल्या वाईट कर्मांचा लेखाजोखा मनाला ठाऊक असतो. तो आपल्याला मनाचा आरसा दाखवून वेळोवेळी सावधही करत असतो. मनापासून आपण काहीच लपवून ठेवू शकत नाही. मनाचे हजारो नेत्र प्रत्येक बारीकसारीक गोष्ट नजरेने टिपत असते. म्हणूनच एखादा माणूस साऱ्या जगाला फसवू शकतो पण स्वत:च्या मनाला नाही. कारण त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार असतं त्याचं मन. जसे आरशात साऱ्याच गोष्टींचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत असते तसेच मनात आपल्या साऱ्या चांगल्या वाईट गुणांचा जमाखर्च लिहिलेला असतो. असे म्हणतात, आपला मेंदू हा मनाचा संदेश वाहक. कोणती गोष्ट करावी, कोणती गोष्ट करू नये हे मनाकडून मेंदूला सांगितले जाते. मन म्हणजे माणसामागचा खरा माणूस. जो अंतर्मनाच्या आत प्रतिबिंबित झालेला असतो.


प्रतिभा कारंजकर, फोंडा- गोवा.