स्मार्ट सिटी : सरकार ‘या’ दिवशी उच्च न्यायालयात सादर करणार कृती अहवाल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April 2024, 03:46 pm
स्मार्ट सिटी : सरकार ‘या’ दिवशी उच्च न्यायालयात सादर करणार कृती अहवाल

पणजी : स्मार्ट सिटीच्या कामांचा सविस्तर कृती अहवाल पुढील आठवड्यात, म्हणजे १२ एप्रिल रोजी सादर करण्यात येईल, असे वचन सरकारच्या वतीने अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी आज गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १६ एप्रिल रोजी होणार आहे.

स्मार्ट सिटीतील कामांविषयी उच्च न्यायालयात पणजीतील नागरिकांनी दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. शिवाय, काल (ता. २) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्वतःहून पणजीत येऊन कामांची पाहणी केली आहे. त्यानंतर आज दोन्ही याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही याचिकादारांच्या वतीने काही सूचना करण्यात आल्या. यामध्ये धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे निरीक्षण केंद्रे स्थापन करणे, काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण करणे, काम सुरू असताना वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नागरिकांना सुरक्षा प्रदान करणे गरजेचे आहे, असे याचिकादारांनी म्हटले आहे.
पणजी शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ‘रिअल टाईम एअर ॲम्बियंट क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स’ स्थापित करा आणि डेटा संकलित करा. अशी मागणी गेल्यावेळी करण्यात आली होती. त्याप्रमाणे डाटा संकलनाचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने उच्च न्यायालयाला दिली आहे. यासंदर्भातील अहवाल त्यांनी सादर केला आहे.

दरम्यान, पणजीतील सर्व रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ववत वाहतुकीसाठी खुले होतील. स्मार्ट सिटीची कामे ठरलेल्या मुदतीच पूर्ण केली जातील. तोपर्यंत वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि धूळ प्रदूषण होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना केली जाणार आहे. याचा सविस्तर कृती अहवाल पुढील आठवड्यात न्यायालयात सादर केला जाईल, असे सरकारच्या वतीने एजी पांगम यांनी उच्च न्यायालयाला सांगितले आहे. आता या दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार आहे.

हेही वाचा