‘लिव्ह इन’मधील पार्टनरचे क्रौर्य... तरुणीची हत्या करून मृतदेह फेकला जंगलात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd April, 11:18 am
‘लिव्ह इन’मधील पार्टनरचे क्रौर्य... तरुणीची हत्या करून मृतदेह फेकला जंगलात

डेहराडून : येथून लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुणी तीन महिन्यांपासून बेपत्ता होती. आता तिचा कुजलेला मृतदेह एका बॅगमध्ये सापडला आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतर पार्टनरचनेच तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. एका राँग नंबरवरून दोघांमध्ये मैत्री झाली होती. नंतर दोघेही एकमेकांना भेटू लागले होते. कालांतराने ते लिव्ह इनमध्ये राहू लागले होते, असेही तपासात आढळून आले आहे.

शाहनूर नामक तरुणीच्या पालकांनी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तीन महिन्यांपासून मुलीशी संपर्क होत नाही, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासात ती तरुणी रशीद नामक तरुणासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती, असे समजले. पोलिसांनी रशीदला चौकशीसाठी बोलावले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.

... अन् मृतदेह फेकला जंगलात

शाहनूर एका ब्युटीपार्लरमध्ये काम करते. पण, त्या ब्युटीपार्लरबद्दल तिने विशेष कधी काहीच सांगितले नाही. अनेकदा ती रात्री घरी येत नव्हती. थेट सकाळीच घरी यायची. याच गोष्टीवरून आमच्यात वाद व्हायचे २७ डिसेंबरच्या पहाटे असाच वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शाहनूरच्या एटीएममधून १७ हजार रुपये काढून मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून जंगलात फेकून दिला, असे रशीदने सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जंगलात जाऊन तपास केला असता सुटकेसमध्ये कुजलेला मृतदेह सापडला. त्यानंतर गुन्हा दाखल करून रशीदला अटक केली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राँग नंबरमुळे झाली मैत्री

पोलिसांनी रशीदचा जबाब नोंदवला आहे. रशीद हा बागोवली गावात एका गॅरेजमध्ये काम करायचा. २०१७-१८ मध्ये त्याची शाहनूरसोबत ओळख झाली. एकदा त्याच्या फोनवर शाहनूरचा चुकून फोन आला. तो राँग नंबर होता. याचा फायदा उठवून रशीदने तिच्याशी गोड बोलून लगेच मैत्री केली. तेव्हापासून ते सतत एकमेकांच्या संपर्कात होते. सप्टेंबर २०२३ मध्ये तो शाहनूरला भेटण्यासाठी बागोवलीतून डेहराडूनला आला. त्यानंतर दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्याने ‘संस्कृती लोक कॉलनी’जवळ एक खोली भाड्याने घेतली. तेथेच तो शाहनूरसोबत राहू लागला, असे जबाबात सांगितले आहे.

शाहनूर रात्री उशीरा यायची, त्यामुळे बळावला संशय

शाहनूरला तिच्या कामाबद्दल विचारले तेव्हा ती पार्लरमध्ये काम करते, असे सांगायची. तिला पार्लरचा पत्ता विचारला तर, नेहमी प्रश्न टाळयची. शाहनूर नेहमी रात्री उशिरा यायची. कधीकधी दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीवर यायची. कारण विचारल्यावर सांगायची नाही. यामुळे मला ती काहीतरी अयोग्य काम करत आहे, असा संशय यायचा, असे रशीदने जबाबामध्ये पोलिसांना सांगितले.

रागाच्या भारात दाबला गळा

२६ डिसेंबर २०२३ रोजीही रशीद रात्री उशिरापर्यंत खोलीत शाहनूरची वाट पाहत होता. २७ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ती खोलीवर आली. यावरून रशीदचे शाहनूरशी भांडण झाले. उशिरा येण्याचे कारण विचारल्यावर शाहनूरने त्याला खडसावले. लिव्ह इनमध्ये राहतो. माझ्या कामात लक्ष घालण्याची गरज नाही. माझ्यावर सतत लक्ष ठेवण्याचा गरज नाही. मला प्रश्न विचारायचे नाहीत, असे सांगितल्याने भांडण झाले त्यामुळे शाहनूरचा गळा दाबून खून केला, असेही रशीदने पोलिसांना सांगितले आहे.