‘फोटो बहाद्दर’ ६ पोलिसांना हायकोर्टाची अवमान नोटीस

स्व-प्रसिद्धीच्या नादात न्यायालयाचा अवमान : १५ राेजी सुनावणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April, 12:56 am
‘फोटो बहाद्दर’ ६ पोलिसांना हायकोर्टाची अवमान नोटीस

पणजी : संशयिताच्या सन्मान आणि मानवी हक्क संरक्षणाची हमी दिलेल्या पोलीस अधीक्षकाने स्व-प्रसिद्धीच्या नादात न्यायालयाचा अवमान केल्याचे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याची दखल घेऊन न्यायालयाने एएनसीचे अधीक्षक बाॅसिएट सिल्वा याच्यासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांना अवमान नोटीस बजावून बाजू मांडण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ रोजी होणार आहे.
गावसावाडा-म्हापसा येथे हाॅटेल प्रीती इंटरनॅशनल समोरील गॅरेजमध्ये एका दिवसाच्या अर्भकाला टाकून पळ काढलेल्या माता-पित्याला अटक केल्यानंतर मातेचे छायाचित्र वृत्तपत्राने २०१९ मध्ये प्रसिद्ध केले होते. या बातमीची उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन म्हापसा पोलीस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक कपिल नाईक यांनी ३० हजार रुपये, तर उपनिरीक्षक अमीन नाईक यांनी १० हजार रुपये मातेला नुकसान भरपाई देण्याचा आदेश जारी केला होता. याशिवाय या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस खात्याने अधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. तसेच वरील आदेशासंदर्भात ६ जानेवारी २०२० रोजी पूर्वी कृती अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
दरम्यान, २७ मार्च २०२४ रोजी फातोर्डा पोलीस स्थानकाच्या हद्दीत बोर्डा-फातोर्डा भागात दीड महिन्याचे बाळ प्लास्टिक पिशवीत बेवारस टाकून दिल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आईचा शोध घेतला. आई विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिच्यासह फोटो काढला. हा फोटो दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमावर प्रसिद्ध करण्यात आला होता. याची दखल घेऊन पोलिसांनी उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये जारी केलेल्या स्वेच्छा याचिकेतील आदेशाचा अवमान केल्याचा दावा केला. त्यानुसार, उच्च न्यायालयाने वरील प्रकरणी अवमान याचिका दाखल करून घेतली.
दरम्यान या संदर्भात सोमवारी सुनावणी झाली असता, न्यायालयीन निबंधकांनी न्यायालयात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सुमारे ७० फोटोंची माहिती सादर केली. त्यात पोलीस अधिकारी २०१९ मध्ये स्वेच्छा दखल घेऊन आदेश जारी केलेले निरीक्षक कपिल नाईक, उपनिरीक्षक अमिन नाईक यांचा समावेश असल्याचे समोर आले. याशिवाय २०१९ मध्ये स्वेच्छा दखल याचिकासंदर्भात न्यायालयात कृती अहवाल सादर केलेले पोलीस अधीक्षक बाॅसिएट सिल्वा यांनीही संशयितांची मानवी हक्क संरक्षण करण्याऐवजी स्व-प्रसिद्धीच्या नादात उल्लंघन केल्याचे समोर आले.
प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
- या प्रकरणाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून पोलीस अधीक्षक बाॅसिएट सिल्वा, फातोर्डा पोलीस स्थानकाचे निरीक्षक नेथन आल्मेदा यांच्यासह महिला उपनिरीक्षक रियांका नाईक, अमिन नाईक, अतिकेश खेडेकर आणि निरीक्षक कपिल नाईक यांना अवमान नोटीस जारी केली आहे. त्यांना १५ एप्रिल रोजी पूर्वी न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे बाजू मांडण्यास सांगितले आहे.
- या संदर्भात वरील उल्लंघन केल्यामुळे संबंधितांवर काय कारवाई करणार याची माहिती सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ रोजी होणार आहे.                               

हेही वाचा