नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, ’आमच्या सरकारची भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई थांबणार नाही’ मग ज्यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी तक्रार केली होती, त्या लोकांवर अद्याप कारवाई का होत नाही, असा सवाल गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी काल एका जाहीर सभेत भ्रष्टाचारावर भाष्य केले होते. भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई नक्कीच केली जाईल. ज्याने देश लुटला त्याला परत द्यावा लागेल, असे मोदींनी म्हटले होते. यावरच बोट ठेवत आज वरील प्रश्न विचारला आहे.
सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींची टिप्पणी शेअर करताना हे सर्वजण तुमच्या पक्षात असून त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. असे का...?’ एवढेच नाही तर आज सर्वाधिक भ्रष्टाचार करणारे लोक भाजपचेच आहेत, असा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला. भाजप या लोकांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी पदे बहाल करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
गोवा, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यांचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक यांनी भाजपवर खरमरीत टिका केली आहे. ‘आज ज्या लोकांनी देशाला सर्वात जास्त लुटले ते भाजपमध्ये आहेत आणि ते कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता तुम्ही त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनवत आहात. घोटाळेबाजांना राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांची तिकिटे दिली जात आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
सत्यपाल मलिक हे भाजपच्या काळात अनेक राज्यांचे राज्यपाल होते. मात्र, शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला होता. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांनी काही लोकांवर जलविद्युत प्रकल्पासाठी लाच दिल्याचा आरोप केला होता. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून अलीकडेच एजन्सी सत्यपाल मलिकच्या काही ठिकाणी पोहोचली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्यपाल मलिक इंडि आघाडीसोबत असल्याचा पुनरुच्चार करत आहेत.