काँग्रेस आपल्याच अंतर्गत राजकारणात गुंतलेली आहे. उमेदवार कोण असेल आणि प्रचाराची रणनीती काय असेल, त्यावर अद्यापही आघाडीतील पक्षांसोबत काँग्रेसने चर्चा केलेली नाही. या सगळ्या परिस्थितीचा फायदा भाजपला होऊ शकतो.
एप्रिल उजाडला तरीही अद्याप काँग्रेसकडून गोव्यातील दोन उमेदवारांची घोषणा झालेली नाही. रोज नवी कारणे देत काँग्रेस उमेदवार जाहीर करण्यास उशीर करत आहे. लोकसभेसाठी गोव्यात आम आदमी पक्षाने स्वतःचे उमेदवार जाहीर केले होते, पण नंतर इंडी आघाडीसाठी आपने माघार घेतली. गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेसला सोडण्याचे ठरले. भाजपने आपले दोन्ही उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडीही घेतली, पण काँग्रेसचे उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीत. काँग्रेसमध्ये उमेदवार जाहीर करण्यावरून नेहमीप्रमाणे यावेळीही वेळकाढूपणा होत आहे. नाराज होणाऱ्यांना बंडखोरीसाठी संधी मिळू नये किंवा त्यांची समजूत काढून दुसऱ्यांना उमेदवारी द्यायची, यासाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करण्यासाठी विलंब करत आहे. पण प्रचारात मागे राहून काँग्रेस आपले नुकसान करून घेत आहे, याची जाणीव काँग्रेसला नसावी.
जानेवारी महिन्यात काँग्रेसने उमेदवारांचा शोध सुरू केला होता. भाजपच्या आधी काँग्रेसचे उमेदवार जाहीर होतील असे काँग्रेसकडून भासवले गेले, पण शेवटी काँग्रेस आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अजूनही भांडण्यातच वेळ काढत आहे. प्रदेश काँग्रेस समितीने जी नावे पाठवली त्या नावांना बगल देत काँग्रेस श्रेष्ठींनी वेगळेच उमेदवार निश्चित केल्यामुळे प्रदेश काँग्रेस समितीला काही किंमतच राहिलेली नाही, असे दाखवून दिले आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी राहुल गांधी यांच्याशी आपले असलेले संबंध वापरून गोव्यात उमेदवार कोण असतील, तेही निश्चित केले. काँग्रेसने गोवा निवडणूक प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या मताला महत्त्व न दिल्यामुळे काँग्रेसमध्येच दुफळी माजली. जी नावे समितीने पाठवलेली आहेत त्याच नावांमधून उमेदवार दिले जावेत, अशी काँग्रेसची मागणी आहे. त्यामुळेच गोव्यातील नेत्यांनी दिल्लीत हा विषय लावून धरला आहे. या सगळ्या गोंधळात काँग्रेसकडून उमेदवार जाहीर केले जात नाहीत.
विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुका पाहिल्या तर त्यांच्या निकालानंतर काँग्रेसचे निवडून आलेले बहुतेक आमदार भाजपमध्ये जाऊ लागल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी फळीच भाजपच्या बाजूने गेली. राज्यातील बहुतेक मतदारसंघांमध्ये आमदार नसल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्याही कमी झाली. भाजपकडे सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ आहे. शिवाय मगो, अपक्ष यांचा पाठिंबाही भाजपला आहे. त्यामुळे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत राज्यभर कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी जी ताकद हवी, ती आता इतक्या कमी वेळात शक्य होणार नाही. त्यासाठीच गोव्यातील उमेदवारांची घोषणा लवकर झाली असती तर काँग्रेसला तळागाळात प्रचार करण्यासाठी वेळ मिळाला असता. काँग्रेसने इंडी आघाडीतील आप, गोवा फॉरवर्ड यांना काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. त्या पक्षांनीही काँग्रेसला पाठिंबा देण्याचे तत्वतः ठरवले आहे. आता काँग्रेसच उमेदवार जाहीर करत नसल्यामुळे इंडी आघाडीतील पक्षांमध्येही नाराजी पसरली आहे. रविवारी इंडी आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी बैठक घेऊन काँग्रेस श्रेष्ठींकडे उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली. उमेदवार जाहीर न करण्यामागे काँग्रेसमधील गटातटाचे राजकारणही तेवढेच जबाबदार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यात असलेले मतभेद पुन्हा उघड झाले आहेत. पाटकर आणि निवडणूक समितीने पाठवलेल्या नावांना बगल देत चोडणकर यांच्या मताला पक्षश्रेष्ठी महत्त्व देत असल्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या दुफळीची स्थिती आहे. पण काँग्रेसमधील या अंतर्गत राजकारणाचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू शकतो, याची कल्पना काँग्रेसच्या या नेत्यांना नाही. इंडी आघाडीतील नेत्यांना लोकसभा निवडणुकीत आघाडीचा उमेदवार जो काँग्रेसकडून दिला जाईल तो बाजी मारेल, असे दिसत असले तरी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होत असल्यामुळे आघाडीतील नेतेही नाराज आहेत. गोव्यात इंडी आघाडीची ताकद मोठी नसली तरी जी आहे त्याचा वापर निवडणुकीत करून घेण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा होता. इथली स्थिती वेगळी आहे. काँग्रेस आपल्याच अंतर्गत राजकारणात गुंतलेली आहे. उमेदवार कोण असेल आणि प्रचाराची रणनीती काय असेल, त्यावर अद्यापही आघाडीतील पक्षांसोबत काँग्रेसने चर्चा केलेली नाही. या सगळ्या परिस्थितीचा फायदा भाजपला होऊ शकतो. काँग्रेसच्या या खेकड्यांच्या प्रवृत्तीला कंटाळलेला मतदार आरजीपी सारख्या पक्षाकडेही वळू शकतो.