कुणकेरीचा चित्तथरारक हुडोत्सव उत्साहात

१०० फुटी हुड्यावर अवसार स्वार, गोवावासीयांचीही उपस्थिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th March, 11:41 pm
कुणकेरीचा चित्तथरारक हुडोत्सव उत्साहात

सावंतवाडी : कुणकेरी येथील हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. १०० फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने दगडांचा मारा केला. हजारो भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ या चित्तथरारक उत्सवाची अनुभूती घेतली. रोंबाट, वाघ शिकार, घोडेमोडनी हे विशेष आकर्षण ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत हुडोत्सव उत्साहात पार पडला.

कोकणातील शिमगोत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या सातव्या दिवशी साजरा होणारा हुडोत्सव तालुक्‍यासह जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणीच असतो. कुणकेरीतील शिमग्याच्या सातव्या दिवशी होणारा हुडोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध व मानाचा असतो. आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल, कोलगावचा श्री देव कलेश्वर यांनी बहीण श्री देवी भावईचे दर्शन घेतले. तिन्ही गावांच्या सीमेवर ही भावा-बहिणींची भेट झाली. त्यानंतर आंबेगाव, कोलगाव, कुणकेरी गावाची निशाण हुड्याच्या ठिकाणी दाखल झाली. यावेळी तीन अवसार कौल घेतल्यानंतर श्रींचा पालखीसह गगनचुंबी शंभर फुटी हुड्यावर एकामागोमाग एक चढले. यावेळी जमलेल्या भाविकांकडून संचारी अवसारावर दगड मारण्यात आले. विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. सायंकाळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.


घोडेमोडणी, वाघ खेळाची परंपरा

घोडेमोडणी, वाघाचा खेळ या ठिकाणी पार पडले. वाघ खेळाची परंपरा जपण्यासाठी थेट लंडन मधून कुणकेरकर गावात दाखल झाले होते. दरवर्षी हे कुटुंब शिमगोत्सवात गावात येतात. पारंपरिक पाथर धनगरणीचा दगड उचलण्याचे पारंपरिक खेळही यावेळी पार पडले. महिला वर्गही या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता.

अवसारांवर दगडांचा मारा

‘भल्ली-भल्ली भावयच्या’ जयघोषात १०० फूट हुड्यावर चढलेल्या अवसाराला दगड मारण्याचा भाविकांनी आनंद लुटला. हा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. हुड्यावर अवसार चढल्यानंतर त्यापाठोपाठ भाविकांनी त्या दिशेने दगडांचा मारा केला. विशेष म्हणजे अवसारावर ज्याचा दगड बसेल तो भाग्यवान मानला जातो. सायंकाळी उशिरा या उत्सवाची समाप्ती झाली.