हरमल येथे १.६९ कोटींच्या ड्रग्जसह रशियन अटकेत

उच्च दर्जाचे सायलोसायबिन मॅजिक मशरूम, इतर ड्रग्ज जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th March, 12:43 am
हरमल येथे १.६९ कोटींच्या ड्रग्जसह रशियन अटकेत

हरमल येथे ड्रग्जप्रकरणी अटक केलेला रशियन नागरिक एवजिनी मोर्कोविनसह एएनसी पथक.

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) हरमल येथे छापा टाकून सर्वांत मोठी कारवाई करून १ कोटी ६९ लाख ४७ हजार रुपये किमतीचे उच्च दर्जाचे सायलोसायबिन मॅजिक मशरूम व इतर ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. राज्यातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. यासंदर्भात एएनसीने एवजिनी मोर्कोविन (३३) या रशियन नागरिकाला अटक केली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) दिलेल्या माहितीनुसार, मधलावाडा-हरमल येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या विदेशी नागरिक ड्रग्ज तस्करीत गुंतल्याची माहिती एएनसीच्या एका अधिकाऱ्याला मिळाली. त्यानुसार, एएनसीचे अधीक्षक बाॅसिएट सिल्वा आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजिंत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील फालकर, पोलीस कॉन्स्टेबल नीतेश मुळगावकर, लक्ष्मण म्हामल, संदेश वळवईकर, सुमीत मुटकेकर, मकरंद घाडी, कुंदन पटेकर, महिला कॉ. वेलसिया फर्नांडिस व इतर पथकाने बुधवारी (दि.२७) सायं. ३.४५ ते रात्री ८.३० वा. मधलावाडा-हरमल येथील एका भाड्याच्या खोलीत छापा टाकला.
यावेळी एएनसी पथकाने एवजिनी मोर्कोविनला ताब्यात घेऊन खोलीची झडती घेतली. त्यावेळी एएनसीने २१८ ग्रॅम सायलोसायबिन मॅजिक मशरूम आणि २ किलो गांजा जप्त करण्यात आला. याच दरम्यान त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने काचेच्या भांड्यांमध्ये सायलोसायबिन मशरूमची लागवड केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, एएनसीने ७.९ किलो सायलोसायबिन मॅजिक मशरूम, तसेच १५० नग मॅजिक मशरूम कळे जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी ६९ लाख ४७ हजार रुपये किमती एवढी आहेत.
या प्रकरणी एएनसीचे उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी संशयित एवजिनी मोर्कोविन याच्याविरोधात २०(बी)(ii)(ए) आणि २२(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयिताला ९ दिवस पोलीस कोठडी ठोठावली.                                

हेही वाचा