उसगाव पंचायत क्षेत्रात ‘पाणीबाणी’

टँकरची सोय करण्याची स्थानिकांची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th March, 12:35 am
उसगाव पंचायत क्षेत्रात ‘पाणीबाणी’

फोंडा : उसगाव पंचायत क्षेत्रातील लोकांना गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. मध्यरात्री नळातून पाणी काही प्रमाणात येत असल्याने महिला वर्गाची झोप उडाली आहे. उडीवाडा येथे गेल्या ४ दिवसांपासून नळातून पाणी पुरवठा बंद झालेला आहे. तर पालवाडा, वडबाग व अन्य गावांतील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. बांधकाम खात्याने पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टँकरची सोय करण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहेत.
उसगाव भागात पाण्याची समस्या दररोज गंभीर बनत आहे. उडीवाडा येथे गेल्या ४ दिवसांपासून नळातून पाणी पुरवठा बंद झालेला आहे. गावापासून सुमारे ३००-४०० मीटर अंतरावर राहत असलेल्या परप्रांतीय कामगारांना कंत्राटदारामार्फत टँकरमधून पाणी पुरवठा केला जातो. त्या पाण्याचा वापर सध्या गावातील लोक करू लागले आहे. रात्री उशिरा गावातील लोक त्याठिकाणी पाणी नेण्यासाठी जात असल्याचे बुधवारी रात्री दिसून आले.


वडबाग व पालवाडा येथेही पाण्याचा तुटवडा लोकांना जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी पालवाडा गावातील महिलांनी फोंडा येथील बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना घेराव घालून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. पण, अद्यापपर्यंत लोकांना पाणी पुरवठा सुरळीत केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वडबाग येथील लोकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी स्थानिक पंच सदस्य मनीषा उसगावकर यांनी स्वखर्चाने दोन टँकरमधून आतापर्यंत पाणी पुरवठा केला आहे. पाण्याची समस्या असली तरी स्थानिक लोक आवाज उठविण्यात तयार नसल्याचे दिसून येत आहे.

उसगाव भागातील अनेक गावांतील लोकांना पाण्याची समस्या जाणवत आहे. अनेकांनी बांधकाम खात्याकडे तक्रारी करूनही अद्यापपर्यंत टँकरमधून पाणी पुरवठा केला जात नाही. मात्र, सरकार अनेक विकासाची कामे पूर्ण केल्याची घोषणा करून दिशाभूल करण्यात व्यस्त आहे. _
मनीषा उसगावकर, पंच सदस्य, उसगाव        

हेही वाचा