मद्य धोरण घोटाळा प्रकरण : गोव्यातील आपच्या चार नेत्यांची सकाळपासून चौकशी सुरूच

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th March, 05:11 pm
मद्य धोरण घोटाळा प्रकरण : गोव्यातील आपच्या चार नेत्यांची सकाळपासून चौकशी सुरूच

पणजी : दिल्ली मद्यधाेरण घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज आप गोवा निमंत्रक अमित पालेकर, रामराव वाघ यांच्यासह व्यवसायिक दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांची चौकशी केली. सकाळी ११.३० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजले तरी चौकशी सुरूच होती. मात्र, चौकशी सुरू असलेल्या चौघांनी याबाबत प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आप नेत्यांना २०२२ मध्ये गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील विचारण्यात आला. तसेच सर्वांना त्यांच्या खाजगी बँक खात्याचे डिटेल्स देखील देण्याचे निर्देश दिले. चौघांनाही ईडीने बुधवारी संध्याकाळी ४ वाजता समन्स पाठवले होते. त्यांना गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता पाटो येथील कार्यालयात बोलवण्यात आले होते.

चौकशी दरम्यान दुपारी १.४५ ते २.१५ दरम्यान सर्वांना जेवण्यासाठी सोडण्यात आले होते. यावेळी पालेकर यांना पत्रकारांनी घेरले. ईडी कोणत्या विषयाबाबत चौकशी करत आहे, याची माहिती मी आत्ताच देऊ शकत नाही. याबाबत तुम्ही ईडी अधिकाऱ्यांना माहिती विचारावी. त्यांनी माझ्याकडे काही डेटा मागितला आहे. तो मी त्यांना देणार आहे. आम्ही त्यांच्या चौकशीला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आमदार वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. ही चौकशी म्हणजे राज्यातील बहुजन समजावर केलेला आघात आहे. भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने विरोधकांना संपवू पाहत आहे. आप नेत्यांना विनाकारण चौकशीसाठी बोलवून केवळ बसवून ठेवण्यात आले आहे. सध्या देशातील लोकशाही वाचविण्यासाठी इंडि आघाडी हा एकमेव पर्याय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा