दक्षिण गोव्यातून नारी शक्तीचा उदय!

कोणाच्याही ध्यानीमनी नसताना दक्षिण गोवा मतदारसंघातून एका महिला उमेदवाराच्या नियुक्तीसाठी प्रयत्न व्हावेत आणि गोव्यातील नामवंत धेंपो घराण्यातील स्नुषा आणि धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्या सुविद्य पत्नी पल्लवी धेंपो यांचे दक्षिण गोव्यातील भाजपच्या उमेदवार म्हणून नावही जाहीर व्हावे हे काही एका रात्रीत घडून आलेले नाही, तर अगदी पूर्ण विचारांती हा निर्णय झालेला आहे.

Story: विचारचक्र |
26th March, 12:26 am
दक्षिण गोव्यातून नारी शक्तीचा उदय!

लोकसभा निवडणुकीचे वेध तर देशाला कधीपासून लागले होते. आता तर लोकसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत आणि १९ एप्रिलपासून एकूण सात टप्प्यात मतदानही होणार आहे. लोकसभेच्या नव्या निवडणुकांच्या निमित्ताने सगळीकडे सध्या चर्चा आहे ती नारी शक्तीची, नारी शक्तीच्या खऱ्याखुऱ्या उत्कर्षाची. महिला सशक्तीकरणावर मागील अनेक वर्षे आम्ही बोलत आहोत आणि वेगवेगळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांची त्यावरील भाषणेही आम्ही ऐकत आहोत. महिला सशक्तीकरण हा बहुतांशी फक्त चर्चेचाच विषय राहिला, पण येणारी लोकसभा निवडणूक त्यास अपवाद ठरू शकते. महिलांसाठीची राखीवता ही लोकसभेच्या पुढील निवडणुकांपासून कार्यवाहीत आणायची असली तरी नारीशक्तीच्या अस्सल उत्कर्षाचा विडा उचलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र याबाबतीत आपण आणि आपला पक्ष किती गंभीर आहे, हे या निवडणुकीपासून दाखवून द्यायचे आहे हेच लोकसभेतील महिला खासदारांची संख्या वाढवण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यावरून म्हणता येईल. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना दक्षिण गोवा मतदारसंघातून एका महिला उमेदवाराच्या नियुक्तीसाठी प्रयत्न व्हावेत आणि गोव्यातील नामवंत धेंपो घराण्यातील स्नुषा आणि धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्या सुविद्य पत्नी पल्लवी धेंपो यांचे दक्षिण गोव्यातील भाजपच्या उमेदवार म्हणून नावही जाहीर व्हावे हे काही एका रात्रीत घडून आलेले नाही, तर अगदी पूर्ण विचारांती हा निर्णय झालेला आहे. नारी शक्तीच्या खऱ्याखुऱ्या उत्कर्षासाठी आम्ही केवळ बोलघेवडेपणा करत नाहीत तर त्यासाठी अधिकच गांभीर्याने पुढची पावले टाकत आहोत, हेच भाजपने यातून दाखवून दिले 

आहे.

पल्लवी श्रीनिवास धेंपो यांची दक्षिण गोव्यातील भाजपच्या उमेदवार म्हणून जाहीर करण्याने नारी शक्तीच्या उत्कर्षासाठी केंद्रातील भाजप सरकारने एकापाठोपाठ एक अशा ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्याचा विचार करता गोव्यात पल्लवीच्या रूपाने नारी शक्तीचा दक्षिण गोव्यातून उदय होऊ लागला आहे असा समज करून घेता येईल काय, हा गोंधळात टाकणारा प्रश्न असला तरी त्याचे उत्तर बहुतांशी होकारार्थीच असेल असे मानता येईल. महिला शक्तीचे जीवन अधिक सोपे सुंदर व्हावे याकरिताच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्तीवर प्रामुख्याने भर देत असल्याचे आपण पाहतो. आपला पंतप्रधान म्हणून तिसरा कार्यकाळ नारी शक्तीच्या उत्कर्षाचा एक नवा अध्याय लिहिणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत तर आहेतच, पण त्याचबरोबर लोकसभेत महिलांचे अधिकाधिक प्रतिनिधित्व असावे यासाठीही कसे प्रयत्नशील आहेत हे दक्षिण गोव्याला महिला उमेदवार देऊन त्यांनी दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे धक्कातंत्र आताशा लोकांसमोर अधिकच येऊ लागले आहे. पल्लवी धेंपो यांचे नाव दक्षिण गोवा उमेदवार म्हणून जाहीर होणे हे धक्कातंत्राव्यतिरिक्त काही वेगळे होते, असे म्हणता येणार नाही. विरोधकांना शेवटपर्यंत अंधारात ठेवून जाहीर केलेली ही उमेदवारी म्हणजे, त्यांना बुचकळ्यात टाकणारीच ठरली आहे. या धक्क्कातंत्रातून विरोधक कितपत सावरतील, याची शंकाच आहे.

धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांना खरे तर राजकारणात उतरण्याची खूप इच्छा होती आणि त्यांनी आपली ही इच्छा अनेकदा बोलूनही दाखवली आहे. मला आठवते, माझ्या 'मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत त्यांनी हे बोलून दाखवताना स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीच आपणाला राजकारणाच्या घाणीत कधीच न पडण्याचा कसा सल्ला दिला आणि आपण नंतर त्यावर कधी विचारच केला नसल्याचे सांगितले. पत्नी पल्लवीची राजकारणात सक्रिय होण्याची कितपत इच्छा होती हे कळायला मार्ग नसला तरी श्रीनिवास धेंपो यांनीच आपली अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी पल्लवीस पाठबळ दिले असावे, असा कोणी तर्क लढवला तर तो चुकीचा म्हणता येणार नाही. मागील दीड दोन दशकात राजकारणातील घाण किती स्वच्छ झाली आहे, हे सांगता येत नसले तरी मनोहर पर्रीकर यांचे राजकीय शिष्य असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मात्र हा मास्टर स्ट्रोक म्हणता येईल.  अर्थातच दिल्लीतून महिला उमेदवार देण्यासाठी दबाव आल्यानंतरच हे सारे घडून आले असले तरी दक्षिण गोवा मतदारसंघातून नारी शक्तीचा नवा अध्याय लिहिण्यास भाजप सुरुवात करेल, याबाबत तीळमात्र संदेह नसावा. धेंपो घराण्याला राजकीय पार्श्र्वभूमी कोणतीही नसली तरी साठेक वर्षांआधी श्रीनिवास धेंपो यांचे चुलत आजोबा स्व. वैकुंठ (सदुल बाब) शेणवी धेंपो यांनी काँग्रेस तिकिटावर पेडणे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. पण ते विधानसभेत पोचू शकले नाहीत. आज सहा दशकांनंतर गोव्यातील एकूण राजकारणाने भलतीच दिशा घेतली असून सद्य परिस्थितीत पल्लवी धेंपो यांचा लोकसभेत होऊ घातलेला प्रवेश कोणी रोखू शकेल, असे वाटत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या गोव्यातील इतिहासावर नजर टाकता, मागील ६१ वर्षांत एकमेव महिला खासदार संयोगिता राणे यांच्या रूपाने १९८० मध्ये उत्तर गोवा मतदारसंघातून लोकसभेत पोचल्या होत्या. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात महिला उमेदवार क्वचितच दिसल्या, पण भारतीय जनता पक्षाने बाजी मारताना महिलांना आश्वस्त केल्याचे दिसते. दक्षिण गोव्यातून तर लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवार कधी रिंगणात दिसलाच नाही. अशावेळेस पल्लवी धेंपो यांचे काम तेवढे सोपे नसले तरी अगदीच कठीण आहे, असे म्हणता येणार नाही. 'धेंपो' फॅक्टर हा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि निर्णायक ठरेल, यात संदेह नाही. त्याचबरोबर भाजपची संघटित शक्ती त्यांच्यामागे भरभक्कमपणे राहणार असल्याने अजून अंधारात चाचपडत असलेल्या काँग्रेसला प्रत्यक्ष रणांगणावर भाजपशी दोन हात करणे सोपे निश्चितच नाही. बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर आदींची झालेली निराशा समजण्यासारखी असली त्यांच्या तुलनेत पल्लवी धेंपो अधिक मताधिक्याने निवडून येण्याची आशा भाजपला बाळगता येईल. गोव्यातील प्रसिद्ध धेंपो, तिंबलो, साळगावकर आदि उद्योजक घराण्यातील स्व. अनिल साळगावकर यांचा अपवाद सोडल्यास निवडणुकीच्या राजकारणात अन्य कोणी उतरले नाही, हा इतिहास असताना तिंबलो घराण्यातून स्नुषा म्हणून धेंपो घराण्यात पोचलेल्या पल्लवी धेंपो यांच्या राजकीय प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे. तरी त्यासाठी असलेल्या अनुकूल अशा वातावरणाचा लाभ उठवत त्यांना धडाकेबाज सुरुवात तर नक्कीच करता येईल. दक्षिणेत भाजपने टाकलेल्या या गुगलीला काँग्रेस पक्ष आता कसे काय तोंड देईल, हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. आता उत्तर गोव्यातला उमेदवार जाहीर करण्यासही काँग्रेसला विलंब का, हे कळत नाही. तेथे कोणता गुगली काँग्रेस टाकणार आहे, असा प्रश्नही गमतीने विचारला जात आहे.

वामन प्रभू

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत)            

मो. ९८२३१९६३५९