मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयिताची आरोपातून मुक्तता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th March, 12:04 am
मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयिताची आरोपातून मुक्तता

पणजी : पीडित मुलीच्या वयासंदर्भात कागदोपत्री आणि वैद्यकीय पुरावे न्यायालयात सादर करण्यास पेडणे पोलीस अपयशी ठरले, असे निरीक्षण नोंदवून पाॅक्सो न्यायालयाने राज्यस्थान येथील ३४ वर्षीय संशयिताला अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी पुराव्याअभावी आरोपातून मुक्त केले. याबाबतचा आदेश न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.

पीडित मुलीच्या आईने २५ सप्टेंबर २०२१ रोजी पेडणे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीने आपल्या १६ वर्षीय मुलीचे १६ ऑगस्ट २०२१ रोजी अपहरण केल्याचे म्हटले होते. त्यानुसार, पेडणे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानंतर पोलिसांनी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी संशयिताला महाराष्ट्रातून अटक केली. त्यावेळी पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली होती. त्यानंतर मुलीने वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला. दरम्यान, संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळी पीडित मुलीने आपण त्याच्यासोबत असल्याचे कबूल केले होते. तसेच त्याच्याशी राजस्थान येथे जाऊन लग्न केल्याची माहिती दिली होती. त्यावेळी न्यायालयाने संशयिताचा जामीन फेटाळून लावला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून पाॅक्सो न्यायालयात संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल केले.

त्यानंतर संशयिताच्या वकिलाने युक्तिवाद मांडून पीडित मुलीच्या वयासंदर्भात संशय व्यक्त केला. तसेच तिच्या वयासंदर्भात कागदोपत्री तसेच वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला नाही. त्यामुळे ती अल्पवयीन म्हणता येणार नाही. तसेच तिच्यावर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुरावे नसल्याचा युक्तिवाद मांडला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एेकून घेतल्यानंतर न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयिताला पुराव्याअभावी आरोपातून मुक्त केले.