ऊन्हात सनस्क्रीन वापराच !

"किती हे ऊन... अजून नीट उन्हाळा सुरूही झाला नाहीये अन् एवढ्यातच उन्हाचे नुसते चटके लागताहेत…" एरवी उन्हात फिरणे तसेही कोणालाच आवडत नाही आणि महिलांना तर बिलकूल नाही. अन् एकदा उन्हाळा सुरू झाला मग तर काय विचारूच नका...

Story: आरोग्य |
22nd March, 10:32 pm
ऊन्हात सनस्क्रीन वापराच !

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण विविध प्रकारचे फेस वॉश, फेस स्क्रब, डे क्रीम, नाईट क्रीम वापरतो. पण उन्हापासून त्वचेला संरक्षण देणाऱ्या सनस्क्रिनचा वापर करणे मात्र नेहमीच राहून जाते. कधी कधी तर सनस्क्रिन विकत आणले जातात. पण, प्रत्यक्ष वापरात येत नाहीत.

कडक उन्हामुळे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलास्मा, सन अॅलर्जी असे अनेक त्रास उद्भवू शकतात. या समस्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचेचा कर्करोग होण्याची संभावना वाढते. पण आपण आधीच काळजी घेतली, सनस्क्रीनचा वापर केला तर सनबर्न, त्वचेवरील लालसरपणा, काळे डाग, सुरकुत्या अशा समस्यांपासून आपले संरक्षण करुन, त्वचेची व आरोग्याची काळजी घेऊ शकतो. 

सनस्क्रीन, ज्याला सनब्लॉक, सन क्रीम किंवा सनटॅन लोशन म्हणतात, हे त्वचेसाठी एक फोटोप्रोटेक्टिव्ह टॉपिकल प्रोडक्ट असते जे सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे शोषून घेते किंवा परिवर्तित करते आणि त्वचेचे सनबर्नपासून संरक्षण करते. सनस्क्रीन हे क्रीम, लोशन, मॉइश्चरायझर, पावडर आणि इतर स्वरूपात उपलब्ध असतात. सूर्याच्या या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी यामध्ये झिंक ऑक्साइड, टायटॅनियम ऑक्साइडसारखे घटक असतात. हे कण त्वचेतून युवी किरणे परिवर्तित करतात. त्यातील रासायनिक घटक त्वचेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी किरणोत्सर्गाशी रिऍक्ट होतात, किरण शोषून घेतात आणि त्यातील ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर सोडतात.

सनस्क्रीन आपल्या त्वचेवर एक थर म्हणून काम करते. युवीबी आणि युवीए किरणांना अवरोधित करणे, शोषून घेणे व संयोजन करणे हे सनस्क्रीनचे महत्त्वाचे कार्य असते. तसेच सनस्क्रीनचा प्रभाव सर्वात जास्त 'एसपीएफ' अर्थात 'सन प्रोटेक्टिंग फॅक्टर'यावर अवलंबून असतो. सनस्क्रीनमध्ये एसपीएफ जितका जास्त असेल तितकी सनस्क्रीन अधिक प्रभावी असते. यामुळे योग्य सनस्क्रीन निवडताना कमीत कमी १५ किंवा त्याहून अधिक एसपीएफसह युवीबी आणि युवीए, असे दोन्ही संरक्षण देणारे सनस्क्रीन निवडले पाहिजे जेणेकरून उन्हात त्वचेचे नुकसान होणार नाही.

सनस्क्रीन का लावावी??

सनबर्नपासून संरक्षण : 

उन्हामुळे आपली त्वचा कमकुवत होते व सनबर्न होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात दररोज बाहेर पडताना न विसरता सनस्क्रीन लावावी.

टॅनिंग टाळले जाते: 

सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे आपल्या त्वचेचे नुकसान होऊन टॅनिंगसारखी समस्या उद्भवू शकते. आपल्या शरीराचा मोकळा भाग सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने रंग बदलतो, गडद होतो, याला टॅनिंग म्हणतात. यासाठी उन्हात निघताना शरीर शक्य तितके झाकून ठेवल्याने व ३० किंवा त्याहून अधिक एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरल्याने टॅनिंग टाळले जाऊ शकते. 


त्वचेचे संरक्षण : 

कोलेजन, कॅराटीन, इलास्टिनसारखी त्वचेची आवश्यक प्रथिने आपली त्वचा मऊ आणि निरोगी ठेवतात. सनस्क्रीन लावल्याने या घटकांचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते.

अकाली वृद्धत्वापासून व त्वचेच्या कॅन्सरपासून संरक्षण : 

सनस्क्रीनमुळे त्वचेवर संरक्षणात्मक थर होतो ज्यामुळे सूर्यकिरण त्वचेला थेट नुकसान पोहोचवू शकत नाहीत व युवी किरणे त्वचेद्वारे शोषून घेण्यापासून रोखली जातात. यामुळे फ्रिकल्स, बारीक रेषा आणि सुरकुत्या रोखणे सोपे होऊन जाते. तसेच मेलेनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमासारखे त्वचेचे कर्करोग होण्यापासून रोखले जाऊ शकतात.

सनस्क्रीन लावण्याचे तोटेही असतात का?

सनस्क्रीन तयार करण्यासाठी विविध रसायनांचा वापर केला जातो. यातील काही रसायने त्वचेद्वारे आतल्या उतींपर्यंत पोहोचून त्वचेला आणि आतील थरांना हानी पोहोचवू शकतात. सनस्क्रीनच्या वापरामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, लालसरपणा येणे, सूज येणे 

अशा प्रतिक्रिया दिसून आल्यास ती ऍलर्जी असू शकते. त्वचा संवेदनशील असल्यास मुरुमांची समस्या वाढू शकते. सनस्क्रीन वापराने कधीकधी डोळ्यांत वेदना, जळजळ जाणवू शकतात. अशा स्थितीत वैद्यकीय सल्ला घेऊनच योग्य सनस्क्रीन निवडावी. 

उन्हाळ्यात त्वचा घामामुळे अधिक चिकट व तेलकट होऊ लागते, अशा वेळी सनस्क्रीन लावण्याचा अनेक लोक कंटाळा करतात. पण तसे न करता व सनस्क्रीन दिवसातून एकदाच न लावता, किमान दोन ते तीन वेळा लावावी. केवळ चेहऱ्यालाच नव्हे तर सर्व दृश्य भागाला सनस्क्रीन लावावी.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर