भीतीचं सावट वाढतंय !

झाडांची पाने गळून पडली की पुन्हा नव्याने पालवी फुटते झाडाला. परंतु माणसांचा विचार केला तर एकदा मनात आलेली भीती त्याला सतत आठवण करून देत राहते. आज काळ बदलत जात आहे तशा घटनाही घडत जात आहेत हे बदलत्या काळाचं वास्तव आहे. मग तो भय स्त्रीच्या सुरक्षिततेचा असो अथवा फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचा.

Story: सय अंगणाची |
15th March, 11:39 pm
भीतीचं सावट वाढतंय !

दहा - बारा वर्षांच्या मुलीच्या मनात जी भीती निर्माण होते ती तिच्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत का म्हणून रहावी? आजकाल तर स्वत:च्या घरातही एकटे रहाणे म्हणजे भीती वाटण्यासारखे. नेमकं काय आणि का घडतंय हे सारं? एकेकाळी इंग्रज, पोर्तुगीजांची भीती मनी असतानाही आपल्यातील वडीलधारी माणसे लढली, जगली खरी. आम्ही लहान असताना शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे बिनधास्तपणे काळजी न‌ करता‌ आम्हाला ठेवून आई बाजारपेठेत वगैरे जायची  पण आज शेजाऱ्यांकडे सोडूनच द्या स्वतःच्या‌ घरात पण‌ राहणं भीतीमय झालयं. विचार केला तर भयानक उदाहरणे समोर उभी राहतात. क्रोध, ‘मी’पणा, प्रेमप्रकरणे, व्यसने, समाजात उद्भवलेले वेगवेगळे विषय आणि या सगळ्याचा सूट म्हणून आत्महत्या, हाणामारी, खून, अपघात हे प्रकार सत्य रुपात घडताना दिसत आहेत आणि या सगळ्यातून आपणाला कोणता निष्कर्ष प्राप्त होतो?


निसर्गातील रानटी जनावरांचा माणसांना त्रास त्यांच्या चुकांमुळे होतो तेव्हा त्यांच्या बंदोबस्तासाठी वेगवेगळे निर्णय घेऊन त्या जीवांचा त्याचक्षणी शेवट केला जातो. मग माणसेच बुरसटल्यासारखी वागतात तेव्हा त्यांच्यासाठी घेतला जाणारा निर्णय हा काही वेळेचा का म्हणून घेतला का जावा? त्यांच्या राक्षसी प्रवृत्तीला आपण चालना का म्हणून देतोय? देशाचा विचार करणे कठीणच परंतु आपल्याच गोमंतकाचा विचार करावासा वाटला तर या भीतीचे सावटही काही कमी नाही. घरात असणारी लहान-लहान मुलं जेव्हा काही गोष्टी विचारतात तेव्हा आपण त्यांना ‘तिथे जायचं नाही’ असं काहीतरी भितीदायक सांगून जातो. मग असं भितीदायक का म्हणून त्यांना आपण सांगतो? स्वत:ला सुशिक्षित म्हणून आपण विकासाच्या वाटेवर असलेल्या समाजात वावरत आहोत. मोठमोठ्यां पदावर असणाऱ्यांशी ओळखही असते प्रत्येकाची. मग एखाद्या गोष्टीविषयी आपले विचार मांडताना जी भीती निर्माण होते ती का? स्वतंत्र देशात स्वतंत्र विचार मांडले तर नजरा एकटक आपल्याकडे का वळल्या जातात? आपण टार्गेट का बनतो? एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपला अपमान होतो म्हणून अपमान करणाऱ्याचा जीव घेण्याचा विचार कसा काय येतोय? असंख्य प्रश्न!! पण त्यांची उत्तरे मात्र मोजकीच.

संस्कार, राग हेच कारणीभूत ठरत आहेत का? या सर्व गोष्टींबरोबर भय, भीती हे शब्द येऊन थांबतात ते स्त्रियांवरच. एकेकाळी पुरुषप्रधान संस्कृतीत वावरणारी स्त्री आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना, स्वतःचा संसार सांभाळताना दिसत आहे परंतु तिने सातच्या आत घरात यावं हा विचार आजही तसाच आहे. याची कारणे तिच्या सुरक्षितेची असतील पण का? हीच भीती तीने आजही बाळगावी? कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास शिक्षा सरकार दरबारी सदैव‌ असते मग अशा अत्याचार करणाऱ्यांवर कडक शिस्तीचे कायदे का नाहीत? एखाद्या अत्याचाराची वार्ता वाऱ्यासारखी पसरते पण काही क्षणानंतर त्याचा निकालही एखाद्याच्या पदरी का पडत नाही? समाज काय म्हणेल, चांगले संस्कार पदरी पडले नाहीत म्हणून आई -वडिलांना टोमणे मारणे हेच करत, दोष देत या गोष्टी दाबून ठेवायच्या का? मनासारखी गोष्ट घडत नाही म्हणून समोरच्याचा गळाही आवळला जातो चार-चौघात?त्यावेळी कुठवर पोहचलेली असते त्यांची मानसिकता ? एक वाईट घटना घडली की आपण चार-पाच दिवस त्याच्यावर तर्क-विर्तक लावत बसतो नुसते. पण त्या गोष्टींविषयी एकजुटीने कार्यरत असतो का? स्वतः सुरक्षित राहताना आपल्या चौफेरचे वातावरण ही सुरक्षित आहे याच्यावर ही नजर ठेवणे गरजेचे आहे. समाज काय म्हणेल याचा विचार आपण करत बसलो तर येणाऱ्या काळात भीतीचे सावट दूर न होता ते पसरत जाईल. एक युवक, एक साहित्यिक, समाजसेवक म्हणून‌ नव्हे जिवंत माणूस म्हणून या सर्वं गोष्टींवर योग्य आणि शिस्तबध्दतेतून विचार प्रत्यकाने केला पाहिजे. या भीतीमय जगातील हिंसक वृत्ती असणाऱ्यांना भीतीमय बनवले तर हे अवतीभोवती भीतीमय बनलेले वातावरणही हळूहळू भीतीमुक्त नक्की बनेल.


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌ सत्तरी गोवा.