भारतात गेल्या एका वर्षात ‘इतके’ लोक झाले श्रीमंत... वाचा सविस्तर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th February, 10:54 am
भारतात गेल्या एका वर्षात ‘इतके’ लोक झाले श्रीमंत... वाचा सविस्तर

नवी दिल्ली : करोनानंतर अनेक देशांत आर्थिक संकटे उभी असली तरी भारतातील लोकांची आर्थिक घोडदौड सुरू असल्याचे नाईट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारत आता श्रीमंतांचा देश बनत चालला आहे. देशातील श्रीमंतांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे समोर आले आहे. २०२३ मध्येच श्रीमंतांच्या संख्येत ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजे, या एका वर्षात भारतात १३,२६३ नागरिक श्रीमंत बनले आहेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.

२०२३  मध्ये भारतातील श्रीमंतांची संख्या वाढली आहे. ही वाढ ६ टक्के झाली आहे. या संदर्भात नाईट फ्रँक इंडियाने एक अहवाल जारी केला आहे. त्यानुसार देशात श्रीमंतांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीमंतांची संख्या वर्षानुवर्षे वाढत असल्याचे समोर आले आहे.

अहवालातील आकडेवारी पाहिल्यास, भारतातील श्रीमंतांची संख्या वार्षिक आधारावर ६ टक्क्यांनी वाढून २०२३ मध्ये १३,२६३ झाली आहे. देशातील वाढत्या समृद्धीमुळे २०२८ पर्यंत अल्ट्रा-हाय नेट वर्थ व्यक्तींची (UHNI) संख्या सुमारे २० हजारांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. UHNI म्हणजे अशा व्यक्ती ज्यांची एकूण संपत्ती ३० दशलक्ष डॉलर किंवा त्याहून अधिक आहे.

‘द वेल्थ रिपोर्ट-२०२४’ प्रसिद्ध

द वेल्थ रिपोर्ट-२०२४ जारी झाला आहे. भारतातील UHNI ची संख्या २०२३ मध्ये ६.१ टक्क्यांनी वाढून १३,२६३ होईल. तर गेल्या वर्षी ही संख्या १२,४९५ होती. भारतातील UHNI ची संख्या २०२८ पर्यंत १९,९०८ पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. देशात संपत्ती निर्मितीमध्ये बदलाचे युग सुरू आहे. भारत सध्या जगात आर्थिक विकास आणि वाढत्या संधींचा पुरावा म्हणून उभा आहे. देशात अत्यंत श्रीमंत लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील पाच वर्षांत त्यात ५०.१ टक्के वाढ अपेक्षित आहे.

चालू २०२४ मध्येही मोठी वाढ शक्य

नाईट फ्रँकच्या अहवालानुसार, २०२४ मध्येही सुमारे ९० टक्के भारतीय UHNI च्या संपत्तीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी, ६३ टक्के मालमत्तांचे मूल्य १० टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. येत्या पाच वर्षांत जागतिक स्तरावर श्रीमंतांची संख्या २८.१ टक्क्यांनी वाढून ८,०२,८९१ वर जाण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर UHNI ची संख्या २०२३ मध्ये ४.२ टक्क्यांनी वाढून ६,२६,६१९ होईल, जी एका वर्षापूर्वी ६,०१,३०० होती. ही वाढ २०२२ मध्ये झालेल्या घसरणीपेक्षा खूपच जास्त आहे.

तुर्कीमध्ये सर्वात जास्त श्रीमंत लोक

तुर्कीमधील श्रीमंतांची संख्या वार्षिक आधारावर सर्वाधिक ९.७ टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर अमेरिकेतील श्रीमंतांची संख्या ७.९ टक्के, भारतात ६.१ टक्के, दक्षिण कोरियामध्ये ५.६ टक्के आणि स्वित्झर्लंडमध्ये ५.२ टक्क्यांनी वाढली आहे.

हेही वाचा