वीज घोटाळाप्रकरणी सुनावणीला आणखी वर्षाची मुदत

एका संशयिताचे अजामीनपात्र वॉरंट केले रद्द


28th February, 11:30 pm
वीज घोटाळाप्रकरणी सुनावणीला आणखी वर्षाची मुदत

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या विरोधातील वीज घोटाळा प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला आणखी एक वर्ष मुदत वाढवून देण्यात आली आहे. यापूर्वी दोन संशयितांना अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्यांतील एका कंपनीच्या वकिलांनी केलेल्या अर्जानुसार न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. पुढील सुनावणी १ मार्चला होणार आहे.
वीज घोटाळाप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा विशेष न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. यावेळी या खटल्याचा निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाकडून मुदतीत वाढ करून देत एक वर्षाची मुदत देण्यात आली. वीज घोटाळा प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी होण्यासाठी ते दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. आता हे प्रकरण निकालात काढण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. मंगळवारी संशयित मे. मार्मागोवा स्टील लि. कंपनीच्या वतीने वकिलांकडून अर्ज सादर करत जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट मागे घेण्याची विनंती केली होती. न्यायालयाने संशयिताविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. दरम्यान, संशयित राधाकृष्ण यांच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
यापूर्वीच्या सुनावणीवेळी एका साक्षीदाराने समन्स घेण्यास नकार दिला, त्याला जामीनपात्र वॉरंट पाठवण्यात आले. सात साक्षीदारांना नव्याने समन्स जारी करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. पुढील सुनावणी १ मार्च रोजी सकाळी १० वा. होणार आहे.

हेही वाचा