विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ मार्चपासून

२७ मार्चपर्यंत चालणार कामकाज : मुख्यमंत्री मांडणार या कार्यकाळातील अंतिम अर्थसंकल्प


4 hours ago
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ मार्चपासून

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ मार्चपासून सुरू होईल. २७ मार्चपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण १४ दिवस कामकाज होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या विधानसभेच्या कार्यकाळातील अंतिम अर्थसंकल्प सादर करतील. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा अंतिम अर्थसंकल्प असल्यामुळे त्याविषयी जनतेत उत्सुकता आहे.
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी अधिवेशनाविषयीचे समन्स जारी केले आहेत. अर्थसंकल्प सलगपणे सादर करण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ही आठवी वेळ आहे. २०१९ पासून आतापर्यंत सलग ७ अर्थसंकल्प त्यांनी सादर केले आहेत. घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सलग सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान डॉ. प्रमोद सावंत यांनाच मिळाला आहे. १७ मार्च २०१९ रोजी मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यानंतर १९ मार्च २०१९ रोजी डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१९-२० वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी सादर केला होता. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांचा पहिला अर्थसंकल्प ठरला. यानंतर २०२०-२१, २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचे अर्थसंकल्प त्यांनी सादर केले. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा तेच मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ असे सलग चार अर्थसंकल्प त्यांनी सादर केले. पुढील वर्षी मार्चपर्यंत विधानसभा निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यामुळे यंदाचा २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प या कार्यकाळातील त्यांचा अखेरचा अर्थसंकल्प ठरतो. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सरकारी खात्यांच्या बैठका सुरू आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मागील वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या कार्यवाहीचा अहवालही ते सादर करतील. अर्थसंकल्पाच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करणारे डॉ. प्रमोद सावंत हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.
१९ आणि २६ मार्च रोजी कामकाज नाही
शुक्रवार, ६ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. अधिवेशन सुरू होईल. शनिवार, रविवार सोडून इतर दिवशी २७ मार्चपर्यंत कामकाज चालेल. १९ मार्च आणि २६ मार्च हे दोन दिवस कामकाज असणार नाही. प्रश्नोत्तरासह शून्य प्रहर, लक्षवेधी सूचना, खासगी प्रस्ताव हे कामकाज चालणार आहे.

हेही वाचा