कपडे व्यवसायाच्या नावाखाली स्टॅन्लीकडून ड्रग्ज व्यवहार

पत्नीचाही सहभाग : ‘बाबा’ आणि ‘पागल’कडून इतर साथीदारांच्या मदतीने ड्रग्जची गोव्यासह हैदराबादमध्ये तस्करी

Story: प्रसाद शेट काणकोणकर। गोवन वार्ता |
28th February, 05:31 am
कपडे व्यवसायाच्या नावाखाली स्टॅन्लीकडून ड्रग्ज व्यवहार

पणजी : तेलंगणा पोलिसांनी अटक केलेल्या इवुआला उडोका स्टॅन्ली आणि त्याची पत्नी गोव्यात कपड्यांच्या व्यवसायाच्या नावाखाली ड्रग्ज व्यवहार करत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय न्यायालयीन कोठडीत असलेले हडफडे येथील हनुमंत बाबूसो दिवकर उर्फ बाबा आणि आसगाव येथील विशाल मांद्रेकर उर्फ पागल हे दोघे रेन्ट ए बाईक आणि कॅब ऑपरेटर इतर साथीदारांच्या मदतीने गोव्यात भेट देणाऱ्या आणि हैदराबादमधील ग्राहकांना ड्रग्ज पुरवठा करतात, असा दावा तेलंगणा पोलिसांनी केला आहे.

तेलंगणा पोलिसांच्या पंजागुट्टा पोलिसांनी ड्रग्ज तस्कर इवुआला उडोका स्टॅन्ली याला अटक केली होती. त्याच्याकडून ८ कोटी रुपयांचे ५५७ ग्रॅम कोकेन, ३९० ग्रॅम एक्टसी टेब्लेट्स, २१ ग्रॅम हेरॉइन, ४५ ग्रॅम गांजा, ३ ग्रॅम एलएसडी ब्लॉट्स, २१५ ग्रॅम चरस, ७ ग्रॅम अॅम्फेटामाइन आणि १९० ग्रॅम गांजासह ५.४० लाख रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी केली असता, नायजेरियन ड्रग्ज तस्कर लारिये, केल्विन, जॉन यांच्या सांगण्यावरून हैदराबादमधील ग्राहकांसाठी ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी आल्याची माहिती दिली. तसेच त्याचे साथीदार हनुमंत बाबूसो दिवकर आणि विशाल मांद्रेकर गोव्यात आणि हैदराबाद येथे तस्करी करत असल्याची माहिती दिली. याशिवाय गोव्यात त्याची पत्नी सिमरन उर्फ उषा चंदेल याच्यासह राजू साळगावकर, मायकल फर्नांडिस, झेवियर फर्नांडिस हे टॅक्सी ड्रायव्हर्स तसेच आॅपरेटरचे गोव्यात ड्रग्जचे एक मोठे नेटवर्क चालवत असल्याची दिली. यात मुंबईतील जाॅन आणि युझोमा, लारिये, केल्विन, प्रिन्स युडो, एडू, ओन्छू, राॅमी, सोन्छी, उछे उर्फ रॉबर्ट उर्फ माटाडोर व इतर नायजेरियन नागरिकांचा समावेश असल्याची माहिती दिली. त्यानुसार, तेलंगणा पोलीस त्याच्या मागावर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एस. आर. नगर पोलिसांनी हनुमंत दिवकर आणि विशाल मांद्रेकर या दोघांना अटक करून कारवाई केली आहे. त्या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या संदर्भात पंजागुट्टा पोलिसांनी तेथील न्यायालयात अर्ज दाखल करून त्या दोघांची चौकशी करण्यासाठी कोठडीची मागणी केली आहे.

तेलंगणा पोलिसांकडून दोघांना अटक

हडफडे येथील हनुमंत दिवकर आणि विशाल मांद्रेकर हे दोघे रेन्ट ए बाईक आणि कॅब ऑपरेटर व इतर साथीदारांच्या मदतीने हैदराबादमधील ग्राहकांना गोव्यात किंवा तिथे ड्रग्ज पुरवत असल्यामुळे त्या दोघांना तेलंगणा पोलिसांच्या एस. आर. नगर पोलिसांनी अटक केली आहे.

सिमरनच्या जामिनावर आज सुनावणी

केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने नायजेरियन ड्रग्ज तस्कर इवुआला उडोका स्टॅन्ली याची पत्नी सिमरन उर्फ उषा चंदेल हिच्यासह राजू साळगावकर आणि मायकल फर्नांडिस यांना अटक केली होती. यातील राजू आणि मायकल या दोघांना म्हापसा येथील विशेष न्यायालयाने २५ हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. तर इवुआला उडोका स्टॅन्ली याची पत्नी सिमरन उर्फ उषा चंदेल हिच्या जामिनावर बुधवार, २८ रोजी सुनावणी होणार आहे.