रेशम भारी गोड मुलगी होती. इयत्ता दुसरीत पण आपल्या दादाच्या तिसरीच्या कविता, धडेही तिचे पाठ होते. शेजारीपाजारी तिच्या एकपाठीपणाचं कौतुक करीत.
रेशम व तिच्या दादाला त्यांची आई वेळेवर खाऊपिऊ घालत असे, तरीही रेशममध्ये एक वाईट खोड होती. कुणी म्हंटलं, आमच्याकडे आज पुरणपोळी आहे की रेशम चालली लगेच त्यांच्यापाठून पुरणपोळी खायला. आईला वरवर सांगितल्यासारखं करायची नि आईचा प्रतिसाद ऐकण्याआधीच तिथनं छुमंतर व्हायची. रेशमच्या आईला मात्र रेशमच्या या सवयीमुळे अगदी कानकोंड व्हायचं.
कुणी म्हंटलं, आम्ही जत्रेला चाललोय, रेशम येतेस का? तर आईला विचारायच्या आधीच रेशम, जत्रेला जाण्यासाठी ड्रेस शोधायला कपाटात. आईने “अजिब्बात जायचं नाही कुठे. अभ्यासाला बैस नाहीतर दादासोबत खेळ” म्हंटलं की रेशमने घातलीच लोळण. फरशीवर अगदी भिंगरीसारखी गोल गोल घुमायची. शेवटी आईला तिला शेजाऱ्यांसोबत पाठवावंच लागे.
एकदा असंच शाळेच्या इथे एका मावशीने रेशमला मोठं चॉकलेट दिलं. रेशमने ते घेतलं नि घरी आई, दादा ओरडतील म्हणून माळ्यावर बसून गुपचूप संपवलं. चॉकलेटचं वेष्टण दप्तरात ठेवून दिलं. दादाच तिचं दप्तर भरायचा. दप्तरात सोनेरी कागद दिसताच दादानं विचारलं, "रेशम, हे गं कुणी दिलं तुला?" "ते मी कविता म्हंटल्या म्हणून बाईंनी दिलं होतं. भूक लागली म्हणून गाडीतच खाऊन टाकलं." रेशमच्या या उत्तरावर दादा थोडासा हिरमुसला.
आता तर रेशमला सवयच लागली, कुणीही काही देऊ केलं की लगेच घ्यायची नि गट्टम करायची. एकदा पेरुच्या बागेत, शाळेतून सहल जाणार होती. दादाला ताप होता नि रेशमला एकटीला पाठवायचा आईचा धीर होत नव्हता पण फिरतीहून घरी आलेले रेशमचे बाबा तिचा एवढुसा चेहरा पाहून म्हणाले, "जाऊदेत रेशमला सहलीला. ती वागेल शहाण्यासारखी."
रेशमची कळी खुलली. ती सहलीची तयारी करू लागली. सहलीला जाताना आईने सतरा सूचना सोबत दिल्या होत्या. "रेशम, सहलीत मुलामुलींच्या घोळक्यातच रहा. एकटी कुठे हिंडू नको. अनोळखी माणसांशी बोलू नको, त्यांनी बोलावलं तर जाऊ नकोस… वगैरे वगैरे." रेशमचं मन कधीच पेरुच्या बागेत पोहोचलं होतं.
पेरुची बाग कित्ती कित्ती सुंदर होती! गोल, लांबोडक्या पेरुंनी लगडलेली पेरुंची टुमदार झाडं बघतच रहावी अशी आणि फांद्याफांद्यांवर हिरवे राघू बसले होते. पेरूंचा अगदी मनसोक्त समाचार घेत होते. लाल चोचीच्या एवढ्या मिठ्ठूंना पाहून मुलंमुली एकदम खूश झाले.
माळीदादाने मुलांना तिखटमीठ लावलेल्या पेरुच्या गुलाबी, पांढऱ्या फोडी खायला दिल्या. पेरुंचा समाचार घेतल्यावर मुलं बागेत खेळू लागली. रेशमही खेळत होती पण तिला मधेच झुडपाआडून कुणी बोलावलं. ती बाईंची व मैत्रिणींची नजर चुकवून झुडपाआड गेली. तिथे एक लांब दाढीवाले, काळा चष्मा लावलेले काका उभे होते. त्यांनी रेशमला चिंचा खायला दिल्या. चिंच म्हणजे रेशमचा जीव की प्राण. ती चिंच खाऊ लागली नि काका डोंगरीवरच्या बोरूच्या झाडांवरची बोरं काढून देतो म्हंटल्यावर ते कुठे नेताहेत तिकडे जाऊ लागली.
इकडे परतायची वेळ आली. बाईंनी मुलं मोजली तर रेशम गायब. बाई रडकुंडीला आल्या. रेशमला शोधायचं कुठे! तिच्या आईला काय उत्तर द्यायचं? तिथे शाळेत मुलांना घ्यायला इतर पालक जमले असतील त्यांना काय सांगायचं!
माळीदादाला पोपटांची भाषा कळायची. "माळीदादा माळीदादा छोटीशी मुग्गी त्या तिकडे डोंगरीवर... काळा चष्मेवाला, ही लांब दाढी... पळा पळा... मुग्गीला शोधा." पोपटांनी कल्ला केला. माळी दादाने सुत्रं हलवली. बाजूच्या चाळीतील तरुणांची मदत घेतली व पेरुच्या बागेमागचा रस्ता ओलांडून डोंगरीवर गेले. डोंगरीवर तर ही गर्द झाडी! वाटेत येणाऱ्या वेली, फांद्या बाजूला सारत ती तरुण पोरं, बाई माळीदादासोबत निघाल्या. फार फार आत एक झोपडी होती. झोपडीचं दार लोटलेलं होतं. माळीदादाने ते लाथेने बाजूला केलं. आत कुणीतरी बसलं होतं. हो, रेशमच होती ती. बाईंनी ओळखलं. रेशमचे हातपाय बांधून तिच्या तोंडात बोळा कोंबून ठेवलं होतं. तिला पळवणारा माणूस बाहेर गेला होता. या लोकांनी तिला सोडवलं व बाईंच्या हवाली केलं. पोलीस आले. त्या माणसाला पकडण्यासाठी ते तिथेच पाळत ठेवून बसले.
रेशम मात्र पुरती घाबरली होती. तिच्या तोंडून ब्र फुटत नव्हता. घरी आल्यावर आईच्या गळ्यात हात टाकून रेशम खूप रडली. आईलाही रडू अनावर झालं. तिची लाडकी मुलगी हातची जाणार होती.
तेव्हापासनं रेशमनं जणू शपथ घेतली, 'कुणाकडून काहीही घेणार नाही. कुणीही अनोळखी माणसाने बोलावलं, खाऊची लालूच दाखवली तरी जाणार नाही अशी". म्हणतात नं अनुभव हाच सर्वात मोठा गुरू आहे. रेशम कुणाचं ऐकत नव्हती पण फटफजिती झाल्यावर आपसूक सुधारली.
गीता गरुड