मनी लाँड्रिंग प्रकरणी सोलोमनसह तिघांच्या चौकशीची आवश्यकता

ईडीकडून न्यायालयात अर्ज दाखल; २८ रोजी सुनावणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th February, 12:19 am
मनी लाँड्रिंग प्रकरणी सोलोमनसह तिघांच्या चौकशीची आवश्यकता

पणजी : मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने ७ मार्च २०२० रोजी माझलवाडो-आसगाव येथे छापा टाकून उगोचुक्वू सोलोमन उबाबुको (नायजेरिया) याच्यावर कारवाई केली होती. या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा प्राथमिक पुरावा असल्यामुळे सोलोमन व इतर दोघांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हापसा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने संशयितांना नोटीस जारी करून पुढील सुनावणी २८ रोजी ठेवली आहे.

एनसीबीने माझलवाडो - आसगाव येथे छापा टाकून उगोचुक्वू सोलोमन याच्यासह वॅलेन्टाईन ईजेझिए उर्फ डॅव्हिड (काँगो) या दोघांना प्रथम ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पथकाला विविध कंपन्यांची सुमारे दहापेक्षा जास्त मोबाईल सीमकार्ड, ११ मोबाईलसह सीमकार्ड, बँकेची कार्ड व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडली. छाप्याच्या वेळी एनसीबीने दोन्ही संशयितांकडून एलएसडीचे ४१ ब्लॉट, २८ ग्रॅम चरस, २२ ग्रॅम कोकेन, १.१०० किलो गांजा, १६० ग्रॅम पांढरी पावडर, ५०० ग्रॅम निळ्या रंगाचा पावडर अमली पदार्थ साठा आणि १० हजार रुपयांची रोकड जप्त केली होती.

या प्रकरणात एनसीबीने उगोचुक्वू सोलोमन याच्यासह वॅलेन्टाईन ईजेझिए उर्फ डॅव्हिड (काँगो) आणि प्रसाद वाळके याच्याविरोधात २ सप्टेंबर २०२१ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची ईडीने चौकशी केली असता, यात मनी लाँड्रिंगचा प्राथमिक पुरावा असल्याचे समोर आल्यामुळे ईडीने वरील तिघा संशयितांची जबानी नोंद करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार, न्यायालयाने त्यांना नोटीस बजावून पुढील सुनावणी २८ रोजी ठेवली आहे.

उगोचुक्वू सोलोमन उबाबूको याचे कारनामे

उगोचुक्वू सोलोमन उबाबूको (३९) याला प्रथम कळंगुट पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ५ डिसेंबर २०१२ रोजी पोरबावाडो - कळंगुट येथे सापळा रचून अमलीपदार्थ प्रकरणी अटक केली होती. म्हापसा येथील न्यायालयाने १२ डिसेंबर २०१२ रोजी सोलोमनला सशर्त जामीन मंजूर केला होता. जामिनावर सुटल्यानंतर आरोपी पसार झाला होता.

नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग्ज तस्करी प्रकरणी आरोपी सोलोमन आणि त्याच्या साथीदाराला २८ ऑक्टोबर २०१३ रोजी पणजीत अटक केली होती. त्याच्याकडून ४५१ ग्रॅम कोकेन जप्त केले होते. या प्रकरणी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. एनसीबीने न्यायालयात २१ फेब्रुवारी २०१४ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने २२ जून २०१५ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला. या प्रकरणात न्यायालयाने सोलोमनची पुराव्याअभावी १ एप्रिल २०१६ रोजी निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर सोलोमनला हैदराबाद पोलिसांनी १७ ऑगस्ट २०१६ रोजी अमली पदार्थ तस्करी प्रकरणी इतर सहा नायजेरियन नागरिकांसह अटक केली होती. २ सप्टेंबर २०१६ रोजी तेथील न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.

दरम्यान, कळंगुट पोलीस स्थानकाच्या गुन्ह्याप्रकरणी तत्कालीन उपनिरीक्षक हळर्णकर यांनी ९ फेब्रुवारी २०१६ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपी फरार असल्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित करून कारवाई सुरू केली होती. एनसीबीने ७ मार्च २०२० रोजी माझलवाडो-आसगाव येथून आरोपी सोलोमनला इतर साथीदारांसह ड्रग्ज बाळगल्याबद्दल अटक केली होती.

कळंगुट प्रकरणात न्यायालयाने आरोपी सोलोमनला सहा महिने सश्रम कारावासाची व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. २५ ए अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडात्मक रक्कम न जमा केल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. या शिक्षेला आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिल्यानंतर खंडपीठाने त्याची शिक्षा निलंबित करून त्याला जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर गुन्हा शाखेने सोलोमनला दि. १ जानेवारी २०२४ रोजी उत्तरारात्री १.४५ ते पहाटे ३.५० दरम्यान म्हापसा येथील मार्केट यार्डजवळ सापळा रचून उगोचुक्वू सोलोमन उबाबूको याला अटक केली होती. त्याच्याकडून ८५ हजार रुपयांचा ७.२१७ ग्रॅम कोकेन, एक मोबाईल आणि ४,९४९ रुपये मिळून १.०५ लाख रुपये किमतीचा एेवज जप्त केला होता. या प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीत आहेत.

ड्रग्ज तस्कर प्रसाद वाळके याचे कारनामे

एनसीबीला आसगाव येथील एका घरात ड्रग्ज साठा ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने ११ जानेवारी २०१९ रोजी आसगाव येथील संशयित प्रसाद वाळके याच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी पथकाने अमली पदार्थ जप्त केले होते.

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज तस्कर प्रसाद वाळके याला ७ आॅगस्ट २०२३ रोजी ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक केली. त्याच्याकडून ४ लाख २० हजार रुपये किमतीचा ३० ग्रॅम उच्च दर्जाचा गांजा, १५ ग्रॅम एमडीएमए आणि १५ ग्रॅम एॅक्टसी पावडर जप्त केली आहे. दरम्यान, संशयित वाळके न्यायालयीन कोठडीत आहे.