मडगाव येथील अपघातात दोन महिला जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th February, 11:39 pm
मडगाव येथील अपघातात दोन महिला जखमी

मडगाव येथे झालेल्या अपघातातील वाहने.   

मडगाव : मडगावातील रिंगरोडवरील शहरातून येणाऱ्या वाहनांना रेल्वे पुलावर जाण्यासाठी केलेल्या रस्त्यावर शनिवारी सकाळी कारने दुचाकीला ठोकरले. यात दुचाकीवरील दोघा महिलांना किरकोळ दुखापत झालेली आहे. यानंतर स्थानिकांकडून सदर ठिकाणी गतिरोधक तसेच मिरर उभारणी करण्याची मागणी केलेली आहे.
मडगावात दुचाकी व पादचाऱ्यांसाठी उभारलेल्या पुलावरून जाणाऱ्या दुचाकीला रिंगरोडवरुन येणाऱ्या कारने धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्ही महिला रस्त्यावर पडल्या व त्यांना दुखापत झाली. याशिवाय दुचाकी व कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. या अपघातानंतर रिंगरोडवर दोन्ही बाजूने केले जाणारे पार्किंग या विषयासह गतिरोधक, माहितीदर्शक फलक किंवा मिरर नसण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. रिंगरोडवर दोन्ही बाजूने कार पार्क केल्या जातात. रेंट अ कार चालवणाऱ्या पर्यटकांना रस्त्यांची माहिती नसल्याने काहीवेळा या रिंगरोडवर त्यांचा गोंधळ उडतो. शहरात जाण्यासाठी ते सरळ वाहने हाकतात. ज्याठिकाणी अपघात झाला त्याठिकाणी चार रस्ते एकत्र येतात. कोणत्याही रस्त्यावर गतिरोधक नाही. शहरातून गाडी घेऊन येणाऱ्याला रिंगरोडवरून येणाऱ्या गाडीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. अपघातात कुणाचातरी जीव जाण्याआधी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे.