हेच का ते प्रेम ?

बहुतांशी जणांचे प्रेम हे शारीरिक आकर्षणातून जन्माला आलेले असते. अशा वासनांध प्रेमात मनापेक्षा शरीराला अधिक स्थान असते. त्यातूनच आपण जिच्यावर प्रेम करतो ती शरीराने मिळत नसेल, तर तिला जगण्याचाच अधिकार नाही ही विकृती बळावून स्वत:च्या प्रेयसीची हत्या करण्यापर्यंत अनेकांची मजल जाते. पण, त्याचे समाज​मनावर होणारे परिणाम किती घातक असतात, याची जाणीव त्यांना कधीही नसते. ही जाणीव जेव्हा प्रत्येकाला होईल, तेव्हा एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या गुन्ह्यांना निश्चितच आळा बसेल.

Story: उतारा |
17th February, 10:24 pm
हेच का ते प्रेम ?

प्रेम...माणसाला माणसाशी घट्ट बांधून ठेवणारा हा शब्द. जन्माला आलेला प्रत्येक माणूस या शब्दापासून कधीही अनभिज्ञ राहत नसतो. प्रेम हा शब्द केवळ प्रियकर-प्रेयसी यांच्यापुरताच कधीच मर्यादित नसतो. प्रेमाला अनेक पदर असतात, अनेक कंगोरे असतात. आपुलकी, मायेने जोडलेल्या प्रत्येक नात्यामध्ये प्रेम लपलेले असते. पण, सध्याच्या जागतिकीकरणाच्या झपाट्यात तरुणाईची प्रेमासंदर्भातील संकल्पनाच बदलत चालली आहे. एकतर्फी प्रेमात अडकून पडलेल्यांकडून तर ही संकल्पनाच संपवण्याचा प्रयत्न होत आहे. ‘ती माझी नाही झाली, तर मी ​तिला अन्य कुणाचीही होऊ देणार नाही’ या मानसिकतेतून मुली, महिलांवर हल्ले होण्याचे प्रकार देशभरात वाढत आहेत. असाच एक प्रकार ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात १४ फेब्रुवारीच्या सकाळी गोव्यातील फोंडा तालुक्यात घडला. त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली. या भयानक प्रकारामुळे राज्यभरातील पालकांमध्ये भीती आ​णि अस्वस्थता पसरली.

पालवाडा-उसगाव येथील २४ वर्षीय मंथन गावडे या संशयित युवकाने प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणीच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी आढळलेल्या संबंधित तरुणीला स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने उपचारांसाठी गोमेकॉत पाठवले. त्यानंतर संबंधित युवकाला पोलिसांनी अटकही केली. गेल्या काही महिन्यांत, वर्षांत अशाप्रकारे एकतर्फी प्रेमातून तरुणींवर हल्ले होण्याचे किंवा त्यांचे जीव घेण्याचे प्रकारही राज्यात घडले आहेत. त्यातूनच सध्याच्या तरुणाईच्या मानसिकतेसंदर्भात अनेक प्रश्न समाजासमोर उभे राहत आहेत.

मंथन गावडे याने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर केलेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे गेल्या काही वर्षांत राज्यात घडलेल्या अशाप्रकारच्या घटना प्रत्येकाच्या डोळ्यांसमोरून निश्चित तरळून गेल्या असतील. परफ्युम एक्स्पर्ट व प्रख्यात फोटोग्राफर मोनिका घुरडे हिच्यावर ऑक्टोबर २०१६ मध्ये सोसायटीचा सुरक्षारक्षक असलेल्या राजकुमार याने सांगोल्डा येथील घरात बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिची हत्याही केली. जगभरात खळबळ माजवलेले हे प्रकरण एकतर्फी प्रेमातूनच होते, हे काहीच दिवसांत उघड झाले. तीन वर्षांचे प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून पर्वरी येथे राहणाऱ्या कामाक्षी शंकर उड्डापनोव या ३० वर्षीय युवतीची तिचा प्रियकर असलेल्या फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड याने​ मित्रासोबत हत्या केली आणि तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकून दिला. पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत या खुनाचा छडा लावत दोन्ही संशयितांना अटक केली. त्याच्या पुढे जाऊन प्रेमाला नकार दिल्याने जुने गोवेतील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या गौरव बिद्रे याने खांडोळा कॉलेजमधील डॉ. प्रा. गौरी आचारी यांचा खून केला. गौरीने आपल्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला. त्याच निराशेतून आपण तिचा खून केल्याचे गौरव ब्रिदेने पोलीस चौकशीत स्पष्ट केले. ही प्रकरणे उजेडात आल्यामुळे त्यांची चर्चा झाली. पण, आजही राज्यातील विविध भागांतील तरुणी अशाप्रकारच्या एकतर्फी प्रेमाच्या प्रकरणांना शारीरिक, मानसिकदृष्ट्या बळी पडत चाललेल्या आहेत. सहन होणे बंद झाल्यानंतर काही जणी पोलीस स्थानके गाठत आहेत. पण, आई-वडिलांचे नाव खराब होईल या भीतीने अनेकजणी मुकाट्याने एकतर्फी प्रेमाची शिक्षा भोगत आहेत. मंथन गावडेच्या प्रकरणातील नेमके सत्य अजून बाहेर आलेले नाही. पण, केवळ प्रेमाला नकार दिला म्हणून, प्रेमसंबंध अर्ध्यावर सोडले म्हणून जीव ओवाळून टाकलेल्या एखाद्या तरुणीचा जीव घेण्याची, तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची मानसिकता तरुणांमध्ये नेमकी येते कुठून? असे करताना त्यांच्या मनाला काहीच वाटत नसेल का? त्यांच्या काळजातील प्रेमाचा ओलावा संपत असेल का? स्वत:चे नैराश्य संपवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा घात करणे खरेच योग्य आहे का? आपण ज्याला प्रेम म्हणतो ते हेच का प्रेम? खऱ्या प्रेमाची ही बाजू कोणती? असे हजारो प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.

खरेतर मनापासून एकमेकांचे होणे, एकमेकांना समजून घेणे, संकटकाळात एकमेकांचे आधार बनणे आणि एकमेकांची काळजी घेत आयुष्याचा प्रवास सुरू ठेवणे म्हणजे प्रेम. वयात आल्यानंतर प्रत्येकाच्याच कोवळ्या मनाला पालवी फुटते. प्रत्येकजण कधी ना कधी प्रेमात पडत असतो. प्रेम ही जगण्याला सुंदर बनवणारी तरल भावना आहे. पण, सध्याच्या काळात तरुणाईने प्रेम या संकल्पनेचे संदर्भच बदलून टाकलेले आहेत. बहुतांशी जणांचे प्रेम हे शारीरिक आकर्षणातून जन्माला आलेले असते. अशा वासनांध प्रेमात मनापेक्षा शरीराला अधिक स्थान असते. त्यातूनच आपण जिच्यावर प्रेम करतो ती शरीराने मिळत नसेल, तर तिला जगण्याचाच अधिकार नाही ही विकृती बळावून स्वत:च्या प्रेयसीची हत्या करण्यापर्यंत अनेकांची मजल जाते. पण, त्याचे समाज​मनावर होणारे परिणाम किती घातक असतात, याची जाणीव त्यांना कधीही नसते. ही जाणीव जेव्हा प्रत्येकाला होईल, तेव्हा  एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या गुन्ह्यांना निश्चितच आळा बसेल.

फोंड्यातील मंथन गावडेच्या प्रकरणाचे पडसाद अजूनही राज्यभर उमटत आहेत. या प्रकरणामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसरात्र एक करून पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु, काही विकृत मनोवृत्तीच्या वासनांध युवकांमुळे त्यांच्या मुलींचे आयुष्य पणाला लागलेले असते. त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबांवरही होत असतो. शाळा, महाविद्यालयांमध्ये अशी प्रकरणे राजरोसपणे घडत असतात. परंतु, संस्थेची बदनामी टाळण्यासाठी अनेक शालेय संस्थांकडून अशी प्रकरणे दाबवण्याचे प्रयत्न होतात. अशी प्रकरणे पालकांपर्यंत पोहोचल्यानंतर विद्या​र्थिनींचे पालक पोलिसांपर्यंत पोहोचतात. पण पोलिसही अशांना केवळ समज देऊन माघारी पाठवतात. अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये राजकारण होत असल्याचेही राज्यात यापूर्वी अनेकदा घडले आहे. एखाद्या विद्यार्थिनीने एखाद्या विद्यार्थ्याविरोधात विनयभंगाची​ तक्रार केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचे पालक स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत मिळवून स्वत:च्या मुलाला पोलीस कारवाईतून वाचवतात. पुढे हीच मुले पूर्वीपेक्षाही भयंकर गुन्ह्यांमध्ये सहभागी झाल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी गोमंतकीय जनतेने पाहिलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील अशी विकृती जेव्हा बळावते, तेव्हाच ती नष्ट करण्याच्या दिशेने योग्य पद्धतीने पावले उचलणे गरजेचे आहे.

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनी किंवा तरुणींबाबत घडत असलेल्या घटना रोखणे ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, ही बाब सर्वांनीच लक्षात घ्यायला हवी. माणसाच्या जडणघडणीत सामाजिक आणि कुटुंबातील वातावरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यामुळे कुटुंब, समाज आणि शाळा या तीन मंदिरांमधून विद्यार्थ्यांच्या मनावर सुरुवातीपासून सुसंस्कारांची उधळण होणे आवश्यक आहे. ‘हाताची पाचही बोटे सारखी नसतात’ या वाक्यानुसार सर्वच युवक सुसंस्कारी होतील किंवा चांगले-वाईट समजून घेऊन आयुष्य जगतील असे नाही. त्यामुळे बदलत्या काळात विद्यार्थिनींनीही आपणही विद्यार्थ्यांपेक्षा कमी नसल्याची मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. स्वत:वर ओढवणाऱ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुलींनीही आत्मसंरक्षणाचे धडे गिरवणे काळाची गरज बनली आहे. वेगवेगळ्या कारणांतून मुलींवरील हल्ल्यांत वाढ होत चालली आहे. त्यातूनच वंशाचा दिवा म्हणून मुलालाच प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, मुलींची संख्या घटत असून, त्याचे दूरगामी परिणाम केवळ गोव्यालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला भोगावे लागणार आहेत, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आणि त्यानुसार मार्गक्रमण करणे आवश्यक आहे.


सिद्धार्थ कांबळे, दै. गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.