दर्शन-मोहितची रंगली जोडी; अडखळलेला गोवा सुस्थितीत

रणजी चषक : गुजरातविरुद्ध पहिल्या दिवशी ९ बाद ३०९ धावा

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th February, 10:47 pm
दर्शन-मोहितची रंगली जोडी; अडखळलेला गोवा सुस्थितीत

पणजी : रणजी चषक स्पर्धेत गुजरातविरुद्ध गोव्याची अवस्था दयनीय झाली असता कर्णधार दर्शन मिसाळ व अष्टपैलू मोहित रेडकर यांनी संघाला सन्मानजनक स्थितीत आणून ठेवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गोव्याची स्थिती ९ बाद ३०९ अशी होती.

पहिल्याच दिवशी गोव्याची स्थिती ६ बाद ७२ अशी संकटात होती. दर्शन मिसाळ (८८ धावा, ११० चेंडू, १२ चौकार व ४ षटकार) व मोहित रेडकर (८० धावा, ९१ चेंडू, ८ चौकार व ४ षटकार) यांनी आठव्या गड्यासाठी केलेल्या १२४ धावांच्या भागीदारीमुळे गोव्याने गुजरातविरुद्ध समाधानकारक धावा केल्या. पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येत आहे.

या दोघांव्यतिरिक्त अर्जुन तेंडुलकरच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळेही (७० चेंडूत ४५ धावा) गोव्याला मजबूत धावसंख्या उभारता आली. नाणेफेक गमावल्यानंतर गुजरातने गोव्याला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही गोव्याची सुरुवात खराब झाली. आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणारा अमोघ देसाई वैयक्तिक चार धावा करून बाद झाला. त्यानंतर मंथन खुटकर (१९ धावा), के. व्ही. सिद्धार्थ (१२ धावा), स्नेहल कवठणकर (३ धावा), सुयश प्रभुदेसाई (२८ धावा) व दीपराज गावकर (४ धावा) हे स्वस्तात बाद झाल्यामुळे गोव्याची अवस्था ३३ षटकांत ६ बाद ७२ अशी दयनीय झाली.

गोव्याचा डाव आता काहीच षटकांत संपणार असे वाटत असताना दर्शन व मोहित यांनी गुजरातच्या अपेक्षांवर पाणी फेरले. दर्शनने प्रथम अर्जुन व नंतर मोहित रेडकरसोबत मिळून गोव्याचा डाव समाधानकारक स्थितीत आणला. दर्शनने प्रथम अर्जुनसोबत ७व्या विकेटसाठी ११४ चेंडूत ८९ धावा व नंतर ८व्या गड्यासाठी मोहितसोबत १५२ चेंडूत १२४ धावा जोडल्या.

अर्जुनला रवी बिश्नोईने त्रिफळाचित केल्यानंतर दर्शन सिद्धार्थच्या गोलंदाजीवर बाद झाला. सिर्द्धाच्या गोलंदाजीत षटकार खेचण्याच्या प्रयत्नात मोहितनेही आपली विकेट गमावली. त्यानंतर लक्षय गर्ग आणि हेरंब परब यांनी दिवसातील उर्वरीत षटके खेळून काढली. गुजराततर्फे चिंतन गजा, प्रियजीत जडेजा आणि सिद्धार्थ देसाई यांनी प्रत्येकी २ तर अर्झान नागवासवल्ला व रवी बिश्णोई यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.