दोन वर्षांत १८८ स्वयंअपघातांत १९२ जणांचा मृत्यू

एकूण ५२१ अपघातांत ५५६ जणांचा बळी : सर्वाधिक ४३८ अपघात दुचाकींचे

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
13th February, 12:16 am
दोन वर्षांत १८८ स्वयंअपघातांत १९२ जणांचा मृत्यू

पणजी : राज्यात १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या दोन वर्षांत ५२१ भीषण अपघातांत ५५६ जणांचे मृत्यू झाले. वरील कालावधीत १८८ स्वयंअपघात झाले असून त्यात १९२ जणांनी जीव गमावला आहे. सर्वाधिक ४३८ अपघातांत दुचाकीचा सहभाग आहे. या कालावधीत फक्त दोघा चालकांना अपघाती मृत्यूबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली आहे.
या संदर्भात आलेक्स रेजिनाल्ड यांनी अतारांकित लेखी प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, २०२२ मध्ये २५७ भीषण अपघातांत २७५ जणांचा मृत्यू झाला. २०२३ मध्ये २६४ भीषण अपघातांत २८१ जणांचा बळी गेला. २०२२ मध्ये ८४ स्वयंअपघातात ८७ जणांनी जीव गमावला. २०२३ मध्ये १०४ स्वयंअपघातात १०५ जणांचे मृत्यू झाले. यांपैकी सर्वाधिक ४३८ अपघातांत दुचाकींचा सहभाग आहे. १० अज्ञात वाहनांनी धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाले आहेत.
वरील कालावधीत फक्त दोघांना शिक्षा झाली. तीन चालकांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. एका अपघाती मृत्यू प्रकरणातील वाहन चालकाची आरोपातून सुटका झाली आहे. २० वाहन चालकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्याविरोधातील खटले रद्द करण्यात आले आहेत. १४४ भीषण अपघातांच्या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात अपघाती मृत्यू अहवाल सादर केला आहे. १२ अपघाती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अंतिम अहवाल सादर केला आहे. १०५ अपघाती मृत्यू प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. २३५ अपघाती मृत्यू प्रकरणांचा खटला न्यायालयांत सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी उत्तरातून दिली आहे.