फुटबॉल मैदानावर सामना रंगला असतानाच कोसळली वीज, खेळाडूचा जागीच मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th February 2024, 06:04 pm
फुटबॉल मैदानावर सामना रंगला असतानाच कोसळली वीज, खेळाडूचा जागीच मृत्यू

बांडुंग : गेल्या काही काळापासून क्रीडा जगतात अनेक हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना पाहायला मिळत आहेत. कधी-कधी क्रिकेटमध्ये मैदानाच्या मध्यभागी धावताना खेळाडूचा मृत्यू होत आहे. अशीच एक घटना आता फुटबॉल विश्वातून समोर आली आहे. या घटनेत सामना सुरू असतानाच एका खेळाडूवर चक्क आकाशातून वीज पडली. या दुर्घटनेत त्या फुटबॉल मैदानावरच मृत्यू झाला. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटना कधी आणि कुठे घडली?

ही दुर्दैवी घटना रविवार, ११ फेब्रुवारी रोजी इंडोनेशियातील फुटबॉल सामन्यादरम्यान घडली आहे. या सामन्यादरम्यान FLO FC बांडुंग फुटबॉल क्लबच्या एका खेळाडूचा मृत्यू झाला. या खेळाडूला आकाशातून वीज पडून धक्का बसला. त्याचा व्हीडीओ सोशल मीडियासह सर्वत्र व्हायरल झाला आहे.

सामन्यादरम्यान खेळाडू मैदानावर फिरताना दिसत असल्याचे व्ह‌ीडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, अचानक वीज पडली आणि खेळाडू मैदानावर मृत्युमुखी पडला. हे पाहून त्याचे सहकारी खेळाडू त्याच्याकडे धावले. खेळाडूला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, तेथील डॉक्टरांनी फुटबॉलपटूला मृत घोषित केले.

ही घटना बांडुंगमधील सिलीवांगी स्टेडियममध्ये घडली. हे ठिकाण पश्चिम जावामध्ये आहे. एफएलओ एफसी बांडुंग आणि एफबीआय सुबांग यांच्यात फुटबॉल सामना सुरू असतानाच वीज कोसळली. अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्राझीलमधील एका फुटबॉल मैदानावरही अशी घटना घडली होती. त्या घटनेतही एका खेळाडूचा मृत्यू झाला होता तर, सहा जण जखमी झाले होते. इंडोनेशियामध्येच गेल्या वर्षी पूर्व जावाच्या बोजोनेगोरो येथे सोरेटिन अंडर-१३ चषकादरम्यान एका तरुण फुटबॉलपटूला विजेचा धक्का बसला होता. मात्र, त्यातही २० मिनिटांनी खेळाडूला शुद्धीवर आणण्यात डॉक्टरांना यश आले होते.