रेंन्ट ए बाईक, रेंन्ट ए कॅबकडून तीन वर्षांत २०० अपघात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th February 2024, 12:26 am
रेंन्ट ए बाईक, रेंन्ट ए कॅबकडून तीन वर्षांत २०० अपघात

पणजी : राज्यात दाखल होणारे पर्यटक मद्यपान करून, निष्काळजीपणाने वाहन चालवणे, वाहनाच्या वेग मर्यादेचे उल्लंघन तसेच गोव्यातील रस्ते आणि वाहतूक सिग्नलचे ज्ञान नसल्यामुळे त्यांच्याकडून अपघात होत आहे. राज्यात रेंन्ट ए बाईक आणि रेंन्ट ए कॅब चालवण्याऱ्या पर्यटकांकडून मागील तीन वर्षात २०० अपघात झाल्याची माहिती गृहमंत्री तथा मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी लेखी दिली.
वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी गृह खात्याला तारांकीत प्रश्न विचारला होता. याशिवाय कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी अतारांकीत प्रश्न विचारला होता. त्यानुसार, आमदार साळकर यांनी खात्याकडे मागील तीन वर्षात पर्यटकांनी रेंट ए कॅब चालवून किती अपघात झाल्याची माहिती मागतली होती. याशिवाय अपघाताच्या कारणाची माहितीही आमदार साळकर यांनी मागितली. त्यानुसार, मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी वरील माहिती दिली. तसेच २०२१ मध्ये १७, २०२२ मध्ये २६ तर २०२३ मध्ये २२ मिळून ६५ अपघातांची नोंद झाली आहेत. तर आमदार काब्राल यांनी पर्यटकांकडून रेन्ट ए बाईक आणि कॅब द्वारे मागील तीन वर्षात किती अपघात झाल्याची माहिती मागवली होती. त्यानुसार, २०२१ मध्ये ४५, २०२२ मध्ये ३८ तर २०२३ मध्ये ५२ मिळून १३५ अपघातांची नोंद झाली आहे.