गोव्यासाठी विश्वसनीय आणि हरित वीज पुरवठ्याकडे वाटचाल

Story: अरुण शर्मा |
10th February, 12:08 am
गोव्यासाठी विश्वसनीय आणि हरित वीज पुरवठ्याकडे वाटचाल


- अरुण शर्मा (लेखक इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस, स्टरलाइट पॉवरचे सीईओ आहेत.)

गोव्यासाठी दीर्घकालीन वीज सुरक्षेची खात्री करण्यासोबतच वीज पुरवठ्यात हरित ऊर्जेचा वाटा वाढवण्याच्या दृष्टीने गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड (जीटीटीपीएल) प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. अर्थव्यवस्थेसाठी वीज हे प्राथमिक ‘ग्रोथ इंजिन’ असल्याने, ‘जीटीटीपीएल’ प्रकल्प गोवा राज्यासाठी गेम चेंजर ठरेल, अशी अपेक्षा आहे.

सुलभ, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या विजेचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण औद्योगिक वापर, आरोग्य सेवा, शिक्षण, ऑटोमोबाईलपासून ते गृहोपयोगी उपकरणांपर्यंत सर्व गोष्टींसाठी आपण विजेवर अधिक अवलंबून आहोत. भारताचा शाश्वत सामाजिक, आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी अखंडित वीजपुरवठा महत्त्वाचा ठरला आहे. वीज खंडित होत असल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे परिणाम होतात. यामुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर त्याचे सामाजिक परिणामदेखील होतात. विशेषत: पाणी पुरवठा, रस्त्यांवरील सुरक्षितता, अपघात आदींबाबतीत याचा फटका बसतो.
अलिकडच्या वर्षांत वीज गळती कमी करण्यासाठी वीज पुरवठ्याच्या बाजूने भरीव प्रयत्न केले गेले आहेत. भारत आता डिसेंबर २०२३ पर्यंत ४२८ गीगावॅटच्या स्थापित क्षमतेसह विजेचा तिसरा सर्वांत मोठा उत्पादक म्हणून उदयास आला आहे. शिवाय २०३० पर्यंत स्थापित क्षमतेच्या ५०० गीगावॅटच्या उद्दिष्टांसह अक्षय ऊर्जेवर लक्षणीय भर देण्यात आला आहे, तसेच त्यात लक्षणीय सुधारणाही झालेली आहे. विजेची मागणी सतत वाढत चालली आहे आणि अखिल भारतीय स्तरावर २०१३-१४ मधील ९५७ किलोवॅट अवर्सवरून २०२१-२२ मध्ये १२५५ किलोवॅट अवर्सवर दरडोई वीज वापर वाढला आहे. भारतीय ऊर्जा क्षेत्राने मोठी उलथापालथ केली आहे, त्याला गोवा राज्यही अपवाद नाही. इतर राज्यांच्या आणि अखिल भारतीय सरासरीच्या तुलनेत गोव्यात सातत्याने दरडोई वीज वापर लक्षणीयरीत्या जास्त आहे. गोव्याचा दरडोई वीज वापर २०१३-१४ मधील २१९८ किलोवॅटवरून २०२१-२२ मध्ये ३७३६ किलोवॅटपर्यंत वाढला आहे. वाढत्या विजेची मागणी लक्षात घेता, वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रभावी वीज व्यवस्थापन आणि वीज पुरवठ्यात हरित ऊर्जेचा वाटा वाढवणे यासारख्या काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल, जेणेकरून सर्व नागरिकांना २४×७ विश्वसनीय वीज पुरवठा देता येईल.
वीज वितरण व्यवस्थापनासाठी ग्राहकांमध्ये ऊर्जा-कार्यक्षम उपकरणांचा प्रचार हा एक महत्त्वाचा उपाय आहे. परंतु विश्वसनीय वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पुरवठा आणि वितरण नेटवर्कमध्ये वाढ करणे यासारखे उपायदेखील आवश्यक आहेत. गोव्यासाठी हे खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे.. कारण गोव्यातील सध्याची ऊर्जा पायाभूत सुविधा नाजूक अवस्थेत आहे आणि एन-१ ट्रान्समिशन मर्यादा पाळल्या जात आहेत. जर पश्चिम ग्रीडची विद्यमान ४०० केव्ही ट्रान्समिशन लाइन नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कोणत्याही मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे कोलमडली, तर गोव्याला तीन दिवसांपेक्षा जास्त काळ विजेविना राहावे लागू शकते.
गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड (जीटीटीपीएल) जो सध्या गोव्यात ट्रान्समिशन लाइन प्रकल्प राबवत आहे, हा असाच एक धोरणात्मक उपक्रम आहे, जो या सर्व समस्यांचे निराकरण करू शकतो. ‘जीटीटीपीएल’ प्रकल्प पुढील १५-२० वर्षांसाठी गोव्याची वीज मागणी पूर्ण करणारी ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर वाढवेल आणि मजबूत करेल. यामुळे वितरण नेटवर्कमधील सुधारणांसह राज्यातील वीज पुरवठ्यातील स्थिरता सुनिश्चित होईल.
गोव्यासाठी दीर्घकालीन वीज सुरक्षेची खात्री करण्यासोबतच, वीज पुरवठ्यात हरित उर्जेचा वाटा वाढवण्याच्या दृष्टीने ‘जीटीटीपीएल’ प्रकल्पही महत्त्वाची भूमिका बजावेल. प्रकल्पाची शेल्डे-नरेंद्र ट्रान्समिशन लाइन गोव्याला कर्नाटकातील आगामी सौरऊर्जा प्रकल्पाशी जोडेल आणि राज्याला १,२०० मेगावॅटहून अधिक वीजपुरवठा सक्षम करेल. यामुळे नियामक संस्थांनी वेळोवेळी ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार नूतनीकरणयोग्य खरेदीचे दायित्व पूर्ण करण्यात राज्याला मदत होईल. शिवाय प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर अधिक विश्वासार्ह वीज पुरवठा महागड्या आणि प्रदूषित डिझेल-आधारित जनरेटरवरील रहिवासी आणि व्यवसायांचे अवलंबित्व कमी करण्यात मदत करेल.
राज्यात विश्वासार्ह आणि हरित ऊर्जा आणताना ‘जीटीटीपीएल’ पर्यावरणपूरक कृती करण्यासाठी आणि स्थानिक समुदायांच्या सहकार्याने काम करण्यासाठी देखील वचनबद्ध आहे. आम्ही जमीन मालक, कोमुनिदादी, तसेच जिल्हा आणि स्थानिक प्राधिकरणांसह इतर संबंधितांसोबत काम केले आहे. यामुळे केवळ जमीन मालकांना नुकसान भरपाईचे वितरण करण्यातच मदत झाली नाही, तर पर्यावरण आणि टिकाऊपणाशी संबंधित आमच्या हस्तक्षेपांमध्ये स्थानिक समुदायाचा पाठिंबा मिळवण्यातही मदत झाली आहे. ‘ड्रोन स्ट्रिंगिंग’सारख्या काही तंत्रज्ञानाचा वापर करून लाईनच्या बांधकामादरम्यान पिकाच्या नुकसानीशी संबंधित जमीन मालकांच्या चिंतेचे निराकरण करण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे. प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्प्यात अडथळे कमी करण्यासाठी आम्ही टिकाऊ बांधकाम पद्धती स्वीकारल्या आहेत.
आतापर्यंत आम्ही स्थानिक समुदायांच्या सहकार्याने गोव्यात विविध ठिकाणी सोळा हजार झाडे लावली आहेत. याशिवाय आम्ही गोव्यातील २० सरकारी शाळांमध्ये अत्यावश्यक शालेय साहित्याचे वाटप केले आहे, ज्याचा राज्यातील १९ गावांमधील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. आम्हाला आतापर्यंत या प्रकल्पासाठी मिळालेल्या सर्व पाठिंब्यांबद्दल तसेच समाज आणि पर्यावरणासाठी आमच्या प्रयत्नांबद्दल आम्ही गोव्यातील लोकांचे तसेच प्रशासनाचे आभारी आहोत.
अर्थव्यवस्थेसाठी वीज हे प्राथमिक ‘ग्रोथ इंजिन’ असल्याने, ‘जीटीटीपीएल’ प्रकल्प गोवा राज्यासाठी गेम चेंजर ठरेल, अशी अपेक्षा आहे. विश्वासार्ह, अखंडित आणि २४×७ वीज पुरवठ्याची उपलब्धता औद्योगिक पायामध्ये आवश्यक वैविध्य आणेल तसेच राज्याचे पर्यटन आणि खाण क्षेत्रावरील अवलंबित्व कमी करेल. यामुळे आर्थिक विकासाला आणखी चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होऊन प्रति भांडवली उत्पन्न वाढेल. आम्ही २०२४च्या सुरुवातीची अंतिम मुदत गाठत असताना प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी आमच्या सर्व भागधारकांकडून सतत समर्थनाची अपेक्षा धरत आहोत.

हेही वाचा