कावी कलेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प!

राज्यपाल पिल्लई : अडवलपाल, लामगाव येथील कावी कलेची पाहणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th February, 12:09 am
कावी कलेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प!

डिचोली : गोव्याच्या पारंपरिक कावी कलेला पुन्हा पुनर्जीवित करून हा महान वारसा नव्या पिढीसमोर आणण्यासाठी राजभवनतर्फे विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील अनेक मंदिरात या कलेचे दर्शन आजही घडत आहे. या कलेचे संवर्धन करण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी केले.

राज्यपालांनी अडवलपाल येथील हनुमान मंदिर परिसरातील कावी कलेची पाहणी केली. तसेच देवी शर्वाणीचे दर्शन घेतले.

यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये तसेच सरपंच, देवस्थान समिती सदस्य यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी लामगाव येथील आनंद देसाई यांच्या पुरातन वाड्यास भेट दिली. त्याठिकाणी कावी कला पाहून कौतुक केले.


राज्यपाल म्हणाले, आपण गोव्यातील बहुतेक खेडेगावांना भेट दिली आहे. महात्मा गांधी यांनी खेडेगावांचा विकास होणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्याच प्रेरणेने गावातील परिस्थिती तसेच पुरातन वास्तू कला यांचा अभ्यास करताना लोकांशी संपर्क आला. कावी कलेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे, असे राज्यपाल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात कावी कलेचा उल्लेख करत ती जोपासण्याचा संकल्प केला, असेही त्यांनी सागितले.

गोव्यातील पुरातन वृक्ष संपदा तसेच सांस्कृतिक ठेवा या संदर्भात राज्यपालांनी विशेष उल्लेख केला. आपल्या लेखनातून गोव्यातील विविध खेडी तसेच वृक्ष, गोव्यातील श्वेत कपिला गाय आदींची माहिती संकलित केल्याचे त्यांनी सागितले.

गोवा केवळ सागरी पर्यटनासाठी नाही तर ग्रामीण पर्यटनासाठी विशेष महत्वाचे ठिकाण आहे. आरोग्य, पर्यटन व पुरातन कला संस्कृती लाभलेले उत्तम केंद्र आहे. प्रत्येकाने सकारात्मक विचार धारा बाळगून राज्याच्या विकासात हातभार लावताना जुन्या पारंपरिक कलांचा वारसा जोपासण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. तोच आमचा उद्देश आहे, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी आनंद देसाई व देसाई परिवारातील मंडळींनी राज्यपालांचे मोठ्या दिमाखात स्वागत केले. यावेळी सरदेसाई वाडा पाहून राज्यपाल खुश झाले. पारंपरिक कला जोपासून विशेष योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रिटा श्रीधरन पिल्लई, मिहीर वर्धन, श्री राव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राजभवनतर्फे चार दिवसीय कार्यशाळा

कावी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोव्यातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राजभवनतर्फे १४ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत नवीन दरबार हॉल, राजभवन येथे चार दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राज्यपालांनी दिली. 

हेही वाचा