पेडणे तालुक्यात विजेचा लपंडाव नेहमीचाच !

स्थानिक त्रस्त : भूमिगत वीजवाहिन्यांना नागरिकांची हरकत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December 2023, 06:15 pm
पेडणे तालुक्यात विजेचा लपंडाव नेहमीचाच !

पेडणे : पेडणे तालुक्यात ठिकठिकाणी विजेची समस्या सातत्याने उद्भवत असते. असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी विजेचा लपंडाव झाला नाही. या भागात अधूनमधून लपंडाव सुरूच असतो. वीज विभाग आणि अधिकारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसऱ्या बाजूने डोंगर माळरानावरून किंवा किनारी भागात ज्या उघड्या जागेवरून वीज खांबावरून वीजवाहिन्या नेल्या जातात. वादळी वारा पावसामुळे त्या वाहिन्यावर झाडे झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होण्याचाही प्रकार सुरू असतो. त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून मांद्रे मतदारसंघात अनेक ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या घालून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी काही नागरिकांनी भूमिगत वीजवाहिन्या घालण्यास हरकत घेतल्यामुळे हे काम रखडले आहे.    

तेरेखोलला आजही महाराष्ट्राचा वीज पुरवठा                  

पेडणे तालुक्यातील तेरेखोल हा भाग गोवा क्षेत्राचा असला तरी आजही तेरेखोल गावासाठी महाराष्ट्रातून वीज पुरवठा केला जातो. केरी आणि तेरेखोल या दोन गावांमधून तेरेखोल नदी वाहत असल्यामुळे थेट विजेचे खांब तेरेखोल गावाला घालण्यासाठी पर्याय नसला तरी तत्कालीन आमदार दयानंद सोपटे यांनी प्रयत्न करून केरी ते तेरेखोलपर्यंत पाण्यातून भूमिगत वीजवाहिन्या घातलेल्या आहे. आणि त्याचा पुढील पाठपुरावा स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी केला. एकूण साडेचार कोटी रुपये या भूमिगत वीजवाहिन्यांसाठी खर्च करण्यात आले. 

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकल्पाचे उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले. ज्यावेळी या फिडरचे उद्घाटन होईल त्यानंतर तेरेखोलला गोव्यातून वीज पुरवठा होणार असल्याचे आरोलकर यांनी सांगितले. 

वीजवाहिन्या जीर्ण, यंत्रणाही जुनाट      

* काही वीजवाहिन्या जीर्ण झालेल्या असतात, कधी कधी एखाद्याला नवीन वीज जोडणी द्यायचे असेल तर त्या परिसरातील ट्रान्सफॉर्मर बंद करून जोडणी द्यावी लागते. त्यावेळी विजेचा लपंडाव होतो, एखाद्या ग्राहकाची जर वीज पेटत नसेल तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा खांबावर काम करत असताना सदर वीजप्रवाह बंद ठेवावा लागतो.       

* कधी कधी फिडर बंद असतो. काम करत असताना किंवा नवीन जोडणी देताना हे फीडर बंद करावे लागतात. त्यामुळेही वीज सतो. कधीतरी झम्पर ११ केवी ओवर करंट येतो, तेव्हा तो निकामी होतो त्यामुळे वीज गायब होते. इन्सुलेटर पंक्चर होतात, पाऊस सुरू होण्यापूर्वी त्या इन्सुलेटरवर मोठ्या प्रमाणात धूळ बसलेली असते बुरशी आलेली असते आणि गडगडात आल्यानंतर इन्सुलेटर निकामी होऊ शकतो.       

* काही ठिकाणी वीज गेल्यानंतर फॉल्ट लवकर मिळत नाही. इन्सुलेटर कुठला निकामी झाला ते शोधावे लागते, हेअर क्रॅक इन्सुलेटर पावसात फिडरवर रील निकामी होतात, अशा अनेक कारणांमुळे विजेचा लपंडाव सुरू असल्याची माहिती वीज अधिकारी देत असतात.       

विजेचा कमी-जास्त दाब तापदायक      

काही ठिकाणी कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने घरातील पंखे, विजेवर चालणारी उपकरणे चालत नाहीत. तर काही ठिकाणी पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात वीज व्यावसायिकांना लागत असल्यामुळे त्याचे परिणाम घरगुती विजेवर होतात. त्यामुळे वीज पुरवठा जास्त प्रमाणात व्हावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.