वाढत्या अपघातांनी गोवा यंदाही हादरला!

दहा महिन्यांत २,३६८ अपघात; २३५ जणांचा मृत्यू, ‘इअर एंड’ही ठरू शकतो घातक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December 2023, 12:18 am
वाढत्या अपघातांनी गोवा यंदाही हादरला!

यंदाच्या वर्षात जानेवारीपासून सुरू झालेली राज्यातील अपघातांची मालिका अजूनही कायम आहे. गेल्या नऊ दिवसांत विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर काही ठिकाणी घडलेल्या किरकोळ अपघातांत काही जण जखमीही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील अपघात, त्यातील बळी आणि इतर स्थितीचा घेतलेला आढावा...

पणजी : जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या दहा महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात २,३६८ अपघातांची नोंद झाली असून, त्यात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी ३,०११ अपघातांत २७१ जणांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये राज्यात देशी-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणातही दरवर्षी वाढ होत असते. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा अपघात आणि त्यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात २,४९५ अपघात घडून त्यात २१७ जण दगावले होते. तर, यंदाच्या ऑक्टोबरमध्ये २,३६९ अपघात होऊन त्यात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा दहा अपघातांमध्ये सरासरी एकाचा मृत्यू झाला असून, सर्वाधिक ७०.६३ टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

राज्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकार विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी कारवाया करण्यात येत आहेत. सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार त्यांना दंडही आकारण्यात येत आहे. तरीही वाहतूक नियमांच्या उल्लंघनात वाढच होत चालली आहे.


जानेवारी​ ते ऑक्टोबर २०२३ मधील स्थिती

- २,३६८ अपघात, २३५ जणांचा मृत्यू

- २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये अपघातात ५.०९ टक्क्यांनी घट; पण अपघाती मृत्यूंत ८.२९ टक्क्यांनी वाढ

- यंदाच्या अपघाती मृत्यूंत सर्वाधिक ७०.६३ टक्के (१६६) मृत्यू दुचाकी चालक आणि त्यांच्या मागे बसलेल्यांचे

- दहा महिन्यांत १३७ दुचाकी चालक आणि दुचाकीवर मागे बसलेल्या २९ जणांचा मृत्यू

- ३५ पादचाऱ्यांसह, इतर ३४ जणांचा अपघातांमध्ये मृत्यू


किती आहेत अपघात प्रवण क्षेत्रे?

- राज्यात एकूण ३९ अपघात प्रवण क्षेत्रे, त्यात १४ ‘ब्लॅक स्पॉट’चाही समावेश

- फोंडा वाहतूक पोलीस विभागाच्या हद्दीत सर्वाधिक ११

- मडगाव वाहतूक पोलीस विभागाच्या परिसरात ७

- कळंगुट वाहतूक पोलीस विभागाच्या परिसरात ६

- डिचोली आणि कोलवा वाहतूक पोलीस विभागाच्या परिसरात प्रत्येकी ३

- पणजी, वास्को, पेडणे आणि म्हापसा वाहतूक पोलीस विभागाच्या परिसरात प्रत्येकी २


जिल्हा, अंतर्गत रस्त्यांचे ऑडिट करण्याचे नियोजन

- राज्यातील बहुतांशी अपघातांना खराब रस्ते कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर वाढते अपघात आणि अपघाती मृत्यू रोखण्यासाठी जिल्हास्तरीय तसेच अंतर्गत रस्त्यांचे ऑडिट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याला (पीडब्ल्यूडी) दिले होते.

- त्यानुसार जिल्हास्तरीय तसेच अंतर्गत रस्त्यांचे ऑडिट करण्यासंदर्भातील प्रक्रिया ‘पीडब्ल्यूडी’ने सुरू केली आहे.

- त्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य मार्गांचे तीन वर्षांपूर्वी केलेले ऑडिट अहवालही मागवण्यात आले आहेत. अहवालांचा अभ्यास केल्यानंतर जिल्हास्तरीय तसेच अंतर्गत रस्त्यांचे ऑडिट करण्यास सुरुवात होणार आहे.

- बऱ्याचदा रस्त्यांचे ऑडिट केले जाते. पण, त्यानंतर पुढे काहीच होत नाही. ऑडिट तसाच दाबून ठेवला जातो. त्यामुळे कोणत्या रस्त्यांबाबत काय समस्या आहेत, याची पूर्ण माहिती मिळत नाही. त्यामुळेच ‘पीडब्ल्यूडी’ने खासगी एजन्सींकडून राष्ट्रीय आणि राज्य मार्गांचा ऑडिट अहवाल मागून घेतलेला आहे.


हेही वाचा