गोव्यात आठ महिन्यांत २,६१६ कोटी जीएसटी जमा

मागील वर्षीच्या तुलनेत महसुलात २९१ कोटींची वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December 2023, 12:10 am
गोव्यात आठ महिन्यांत २,६१६ कोटी जीएसटी जमा

पणजी : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा जीएसटी महसूल वाढत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत राज्याचा जीएसटी महसूल २,६१६ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत राज्याचा जीएसटी महसूल २,३२५ कोटी रुपये होता, तो मागील वर्षाच्या तुलनेत २९१ कोटी रुपयांनी जास्त आहे.

यावर्षी गोवाच नाही तर संपूर्ण देशाचा जीएसटी महसूल गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. नोव्हेंबरचा विचार करता गोव्याचा यावर्षीचा जीएसटी महसूल ५०३ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जीएसटी महसूल ४४७ कोटी रुपये होता. यात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये देशाचा जीएसटी महसूल १,६७,९२९ कोटी रुपये होता. यात सीजीएसटी ३०,४२० कोटी रुपये, तर एसजीएसटी ३८,२२६ कोटी रुपये आहे. तसेच सेस रक्कमही १२,२७४ कोटी रुपये आहे.

देशभरातील नोव्हेंबरमधील जीएसटी महसूल मागील नोव्हेंबरच्या तुलनेत १५ टक्क्यांनी जास्त आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण देशाचा जीएसटी महसूल ५,६७,४६४ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत महसूल ५,०७,३५५ कोटी रुपये होता. यावर्षीचा आठ महिन्यांचा जीएसटी महसूल मागील वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त आहे.

सरासरीचा विचार केल्यास यावर्षी महिन्यातील सरासरी जीएसटी ३२७ कोटी रुपये आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये गोव्यापेक्षा मोठी आहेत. त्यांचा नोव्हेंबरमधील जीएसटी महसूल १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

एप्रिलमध्ये सर्वाधिक जीएसटी महसूल

गोव्याचा विचार केल्यास एप्रिलमध्ये जीएसटी महसूल ६२० कोटी जमा झाला. एप्रिलमध्ये सर्वाधिक महसूल जमा झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दर महिन्याला जीएसटी महसूल वाढला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटी महसूल वाढीचा दर मागील वर्षाच्या तुलनेत ३२ टक्के आहे. मे महिन्यात १३ टक्के, जून १२ टक्के, जुलै २२ टक्के, ऑगस्ट ३६ टक्के, सप्टेंबर १६ टक्के आणि नोव्हेंबरमध्ये १२ टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचा