म्हादई प्रश्नावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd December 2023, 11:50 pm
म्हादई प्रश्नावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

पणजी : म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आता ६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने २९ आणि ३० नोव्हेंबर अशा दोन तारखा दिलेल्या होत्या. त्यासाठी गोव्याच्या वकिलांचे पथकही दिल्लीत दाखल झालेले होते. परंतु, या दोन्ही दिवशी सुनावणी टळली होती. अखेर ती ६ डिसेंबरला निश्चित करण्यात आली आहे.

गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या म्हादई नदीच्या पाण्याबाबत जल तंटा लवादाने अंतिम निर्णय दिलेला आहे. त्यानंतरही तिन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. गोव्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात पाच अर्ज दाखल केले असून, पाचही अर्जांवर एकत्रितरीत्या सुनावणी होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात गोव्याची बाजू भक्कम आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी कशाप्रकारे वळवले त्याचे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत. या प्रकरणासंदर्भातील इतर कागदपत्रेही दिली आहेत. कर्नाटकने मात्र आवश्यक कागदपत्रे दिलेली नाहीत. त्यामुळे म्हादईप्रश्नी गोव्याचा विजय निश्चित आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा